वसई: नालासोपाऱ्याच्या धानिव बाग परिसरात विजय चौहान याची हत्या करून फरार झालेल्या पत्नी व तिच्या प्रियकराला पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यातून अटक करण्यात यश आले आहे. हवेच्या झोक्याने महिलेच्या चेहऱ्यावरील ओढणी उडाली आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
धानिव बाग येथील ओम साई वेल्फेअर सोसायटीमध्ये राहणारा विजय चौहान (३२) याची हत्या त्याची पत्नी चमन देवी (२८) आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा (२०) या दोघांनी हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरण्यात आला होता. सोमवारी ही घटना उघडकीस आली होती. मात्र या घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता.
त्यानुसार पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पथके तयार करून तपास सुरू केला होता. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दोघांनाही पुण्यातून अटक केली. बुधवारी दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले आहे.
चमन देवीचा शेजारी राहणाऱ्या मोनू शर्मासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबधाच्या विजय चौहान आड येत असल्याने त्याची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सदरची कारवाई पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, शकील शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वाघचौरे, तुकाराम भोपळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
असा झाला हत्येचा उलगडा
विजय चौहान यांची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह घरातच पुरून त्यावर लाद्या बसविण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर १९ जुलै च्या दुपारी महिला तिचा ५ वर्षांचा मुलगा आणि प्रियकर यांच्यासोबत राहत्या घरातून पळून गेली. त्यानंतर रात्री ते नालासोपारा स्थानक परिसरात राहिले. आणि चर्चगेटमार्गे पुण्याला पळून गेले. पोलिसांना आरोपींच्या वास्तव्याची माहिती मिळताच त्यांनी त्या परिसरात शोध घेतला.
तेव्हा पोलिसांना आधी महिलेचा ५ वर्षांचा मुलगा दिसला. तेथे आरोपी महिला तोंडावर ओढणी बांधून मेडिकलमध्ये काही सामान विकत घेण्यासाठी आली होती. वाऱ्यामुळे महिलेच्या चेहऱ्यावरची ओढणी सरकली आणि पोलिसांनी तिला ओळखले आणि ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.