वसई : नालासोपारा ते कामण अशी विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नवीन ११० मोनोपोल उभारणी व २२ किलोमीटर विद्युत वाहिनी अंथरणे अशा कामाला महावितरणने गती दिली आहे. यामुळे लवकरच वसई पूर्वेच्या भागातील वीज प्रश्न मार्गी लागेल असा दावा महावितरणने केला आहे. त्यामुळे येथील वीज ग्राहक व उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वसई पूर्वेच्या भागात कामण चिंचोटी भागात महावितरणच्या नालासोपारा उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो.मात्र या भागात टाकण्यात आलेली २२ किलोमीटरची विद्युत वाहिनी जुनी झाली आहे तर दुसरीकडे वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे ती अतिभारीत झाली आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते.याचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहक यासह औद्योगिक क्षेत्राला बसत होता. याबाबत उद्योजक व येथील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत येथील समस्यांबाबत संताप व्यक्त केला होता.
वाढता संताप लक्षात घेता महावितरणने या जुनी झालेली २२ किलो मीटरची विद्युत वाहिनी बदलणे तसेच ११० मोनोपोल उभारणीची कामे हाती घेतली आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी पाहणी केली. याच वेळी या २२ केव्हीच्या भूमिगत वाहिनीचे जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर ११० मोनोपोल पैकी ६८ पोल उभारण्यात आले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अवघ्या महिनाभरात संपूर्ण काम कसे मार्गी लागेल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच येथील वीज पुरवठा सुरळित केला जाईल.
नवीन वीज जोडण्या देण्याच्या सूचना
कामण, चिंचोटी, पोमण, ससूनवघर या भागात वीज पुरवठा करताना अतिभार येत होता. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे महावितरणकडून या भागात नवीन वीज जोडण्या दिल्या जात नव्हत्या. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने अखेर महावितरणच्या संचालकांनी तातडीने वीज जोडण्यात देण्यात याव्यात अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.