वसई:- वसई विरार शहरात पुन्हा एकदा बोगस डॉक्टर सक्रिय झाले आहेत. नुकताच पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने चिंचोटी येथे दोन बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विविध ठिकाणी वाढते अनधिकृत बांधकामे व बैठ्या चाळी अशा दाटीवाटीच्या भागात बोगस डॉक्टर दवाखाने थाटू लागले आहेत. दिवसेंदिवस बोगस डॉक्टर शहरात सक्रिय होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेत आहे. यासाठी दोन पथके ही नियुक्त केली आहे.

नुकताच धडक मोहिमेत चिंचोटी-कामण भागातील काही दवाखान्यांची तपासणी करण्यात आली आहे यात चिंचोटी भागात दोन बोगस डॉक्टर कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना दवाखाना चालवीत असल्याचे आढळून आले आहे.

परमहंस क्लिनिकचे सुनील कुमार यादव व ऋतुजा पाईल्स क्लानिकचे लिटन मृत्युंजय विश्वास अशा दोन बोगस डॉक्टरांचा समावेश आहे.त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता ३१८(४), सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३,३३ (अ) व औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन १९४० चे कलम १८ (सी), १८(अ), २७ प्रमाणे नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच आहे. दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते असे पालिकेने सांगितले आहे. याशिवाय  आपल्या परिसरात असे अवैध (बोगस)वैद्यकीय व्यवसायिक असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती द्यावी असे आवाहनही नागरिकांना पालिकेने केले आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 

वसई विरार शहरात परराज्यातून मान्यता नसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्या असलेले, कसलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले ठकसेन डॉक्टर बनून धंदा करत आहेत. यामुळे रुग्णांवर चुकीचे उपचार होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही डॉक्टरकडे सहायक कर्मचारी म्हणून काम करणारे सुद्धा डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करू लागले आहेत.त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षात २८ बोगस डॉक्टरवर गुन्हे

मागील काही वर्षांपासून शहरात बोगस डॉक्टर ही सक्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. जानेवारी २०२० ते  मार्च २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत सुमारे २८ बोगस डॉक्टरांची प्रकरणे महापालिकेच्या आरोग्य पथकाने उघड करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.