वसई: कामण ते चिंचोटी मुख्य रस्तालगत अनधिकृत मातीभराव व अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याने पाणी जाण्याचे नैसर्गिक नाले बंद झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर तयार झालेल्या मोठं मोठ्या खड्ड्यात अडकून अवजड वाहनांचे ही अपघात घडू लागले आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून चिंचोटी – कामण ते भिवंडी असा २२ किलोमीटरचा राज्य महामार्ग गेला आहे. ठाणे भिवंडी यासह अन्य विविध भागांना जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे. विशेषतः मालवाहतूकिच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जातो. याच मार्गावरील कामण ते चिंचोटी या दरम्यान रस्त्यालगत मागील काही वर्षांपासून विविध प्रकारची बांधकामे उभी राहत आहेत. तर काही ठिकाणी अनधिकृत माती भराव टाकून
पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे पावसाचे पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहे.

मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे या रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून येथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे रस्त्याची अवस्था बिकट असल्याने मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे ही अपघात घडत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही या रस्त्यावर मालवाहतूक वाहन उलटले होते. भर पावसात अशी स्थिती निर्माण झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडू लागली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.