वसई: मागील काही वर्षांपासून शहरात पालिकेकडून फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. मात्र अजूनही त्यावर निर्णय होऊ न शकल्याने शहरातील फेरीवाला धोरण रखडलेलेच आहे. त्यामुळे शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे.
वसई विरार शहरात वाढत्या नागरिकरणाच्या सोबतच फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. फेरीवाले शहरात मुख्य रस्ते, ये जा करण्याचे मार्ग, छोट्या गल्ल्या आणि फुटपाथ अशा मिळेल त्या जागी आपले बस्तान मांडून बसत आहेत. वाढत्या फेरीवाल्यांच्या संख्येमुळे ही समस्या आता अधिकच जटिल बनली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, वर्दळीच्या मार्गात अडथळे अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या फेरीवाल्यांची समस्या लक्षात घेता पालिकेने मागील पाच ते सहा वर्षांपासून फेरीवाला धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. यात फेरीवाल्यांना बसण्यासाठीची जागा उपलब्ध करून देणे, रहदारीच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे फेरीवाले हटविणे अशा विविध उपाययोजना केल्या जाणार होत्या. मात्र अजूनही त्यावर धोरणात्मक निर्णय न झाल्याने शहरातील फेरीवाल्यांची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात फेरीवाल्यांची संख्या लाखोच्या घरात गेली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे शहरात मिळेल त्या ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहेत. शहरात फेरीवाले धोरण निश्चित केल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. यामुळे पालिकेने धोरण लवकरात लवकर लागू करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
जागा निश्चितीसाठी प्रयत्न
यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात १४ ते १५ हजार फेरीवाले शहरात असल्याचे समोर आले होते. मात्र प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वेक्षण करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी पुन्हा एकदा प्रभाग निहाय फेरीवाला क्षेत्रांसाठीच्या जागांचा शोध घेतला जाणार आहे. तशा सूचना प्रभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी समिती नियुक्त करून त्या जागा अंतिम करून घेतल्या जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
फेरीवाल्यांसाठी झोन तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रत्येक प्रभागात यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. त्याद्वारे प्रभाग समितीतील फेरीवाला क्षेत्र निश्चित केले जाईल. याशिवाय जे फेरीवाले वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत अशा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.-मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका
फेरीवाला धोरणाचा ठराव ?
पालिकेत सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या महासभेपुढे फेरीवाला धोरणाचा ठराव मंजूर करण्यासाठी ठेवण्यात आला होता. या ठरावामध्ये प्रस्तावित क्षेत्रांची प्रभागनिहाय झोन निश्चित करण्यात आले होते, मात्र त्यावेळी काही प्रभागांना विरोध झाल्याने त्यावेळी तो ठराव स्थगित करण्यात आला होता.