वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणी गटारांची झाकणे ही तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर काही गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. या उघड्या गटारांमुळे पावसाळ्यात त्यात पडून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वसई विरार शहरात सांडपाणी निचरा होण्यासाठी विविध ठिकाणी गटारांची व्यवस्था केली आहे. शहरात नऊ प्रभागात ७०. ६८ किलोमीटर लांबीची गटारे आहेत. त्यावर १ लाख १० हजार ८७ इतकी झाकणे बसविण्यात आली आहे.

मात्र काही ठिकाणी झाकणांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या तुटलेल्या झाकणांमुळे ये जा करणारे नागरिक त्यात पडून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी सुद्धा उघड्या गटारात पडून नागरिक, लहान मुलं यांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. अशा घटना घडल्या नंतर ही पालिकेला अजूनही जाग येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

वसईच्या भास्कर आळी भागात, नालासोपारा पूर्वेच्या शिर्डीनगर, आचोळे डोंगरी, संतोष भवन, बिलालपाडा, धानिव, गालानगर यासह अन्य भागातही गटारांची झाकणे उघड्या अवस्थेत आहेत. नुकताच नालासोपारा पूर्वेच्या नगिनदास पाडा येथे रस्त्यावरील गटारे तुडूंब भरून वाहत होती. याच दरम्यान उघड्या असलेल्या गटारात एक चाकरमानी पडला होता असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. महापालिकेने शहरातील गटारांची पाहणी करून ज्या ज्या भागात झाकणे उघडी आहेत त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तुटलेल्या झाकणांचे सर्वेक्षण

तुटलेल्या झाकणाच्या संदर्भात पालिकेकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत.या तक्रारीच्या अनुषंगाने शहरातील नऊ प्रभागांमध्ये तुटलेल्या झाकणांचे सर्वेक्षण महापालिकेने सुरू केले असल्याचा दावा केला आहे. सर्वेक्षणानंतर ज्या ज्या भागात झाकणे तुटलेली असतील ती आम्ही दुरुस्त करू असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गटारावर झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार

वसई विरार शहरात पालिकेकडून झाकणे बसविली जात असली तरी काही ठिकाणी गटारांवरील झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार समोर येत आहे शहरातील गटारांवर असलेली लोखंडी आणि सिमेंटची झाकणे चोरण्यात येत आहेत. अनेक गटारांवरील बसवलेली नवीन झाकणे चोरण्यात आली आहेत.