वसई: नुकताच नायगाव भाईंदर खाडीपुलावर निर्माल्याचा नारळ डोक्यात लागून तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाणजू बेटावरील विविध प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या बेटावरील समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. यामुळे इथे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वसई नायगाव खाडी व भाईंदर खाडी यामधील परिसरात पाणजू बेट आहे. बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण खाडीच्या पाण्याने वेढलेला असून  हा परिसर अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हा परीसर वसई विधानसभा मतदारसंघात मोडतो. या भागात सुमारे एक हजार चारशे इतकी लोकसंख्या आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या भागाकडून शासन स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याने विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नायगाव व भाईंदर खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर असल्याने येथील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो. सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ही सेवा सुरू असते. काही वेळा हवामान बदलामुळे बोट विलंबाने सुरू असते. तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते. अशा वेळी काही प्रवासी नागरिक नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी प्रवास करावा लागतो. याच पायी प्रवसाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. नुकताच धावत्या लोकलमधून  फेकलेल्या निर्माल्याचा नारळ लागून तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाणजू बेट परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बोटीची सुविधा आहे ती सुद्धा अपुरी आहे तर दुसरीकडे पादचारी पूल तयार करण्यासाठी आम्ही सातत्याने सांगत आहोत मात्र त्याकडे ही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण म्हात्रे यांनी केला आहे. कधी कधी गावात रात्री अपरात्री आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा ही अडचणींना तोंड द्यावे लागते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर येथील मूलभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

पर्यटन विकासाला खीळ

या भागाचा विकास व्हावा या उद्देशाने विविध प्रकल्प शासन स्तरावरून राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः या भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी याशिवाय वसई तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी पर्यटनस्थळ नीती आयोगाने  पहिल्या टप्यात देशातील १ हजार ३८२  बेटांमधुन २६ बेटांची निवड करण्यात आली आहे. त्या २६  बेटांमधे  वसईतील पाणजू बेटाचा समावेश केला होता. या बेटाचा विकास हा बेट समग्र विकास (होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ आयलंड्स प्रोग्राम) या अंतर्गत केला जाणार होता. सात वर्षे उलटून गेली तरी अजूनही या बेटाच्या विकासासाठी हालचाली होत नसल्याने या बेटाचा विकास रखडला आहे.

केंद्राकडे प्रस्ताव 

पाणजू बेटाचा पर्यटन विकास व्हावा यासाठी निधी व्यतिरिक्त विविध विभागाच्या परवानग्या लागणार आहेत. तसेच विकासाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना व त्यात येत असलेल्या अडचणी याचा आढावा पालघर जिल्हा नियोजन विभागाकडून घेतला जात आहे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव ही पाठविण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असून आहे परंतु अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाही असे पालघर जिल्हा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.