वसई पुन्हा एकदा वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. आज (शनिवार) सकाळी साडेआठच्या सुमारास वसई फाटा येथे सीएनजी ऑटोरिक्षाला बसची धडक बसून भीषण आग लागल्याची घटना घडली. रिक्षाचालकाने रिक्षा तातडीने बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

वसई विरार शहरात एका पाठोपाठ एक अशा वाहनांना आग लागण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून शनिवारी सकाळच्या सुमारास सीएनजी रिक्षाचालक नालासोपाऱ्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान वसई फाटा येथे पोहचताच रिक्षाला मागून बसची धडक बसली. त्यामुळे अचानकपणे स्पार्क होऊन आग लागली.

आग लागल्याने लक्षात येताच रिक्षाचालकाने रिक्षा बाजूला घेतली. अवघ्या काही वेळातच रिक्षाने अधिकच पेट घेतला होता. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने या आगीत रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य रहदारी असलेल्या मार्गावर ही घटना घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला आग लागल्याची घटना घडली होती. शहरात सीएनजी वाहनांना आग लागण्याचे प्रकार घडू लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालकांनी ही आपल्या वाहनांची सर्वबाबींची योग्य तपासणी करावी जेणेकरून वाहनांना आग लागण्याचे प्रकार टाळता येतील, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.