वसई: वसई पश्चिमेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या संख्येमुळे या रुग्णालयाचा विस्तार करून नवीन ७० खाटांची क्षमता वाढविली आहे. विस्तारित रुग्णालयाचा सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. विशेषतः या खाटा गर्भवती महिला व नवजात शिशु यांच्या उपचारासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले आहे.त्यामुळे शहराची लोकसंख्या ही भरमसाठ वाढली आहे. लोकसंख्येच्या मानाने शहरात आरोग्य सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. सध्या शहरात पालिकेची ९ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्यातून शहरातील नागरिकांना वैद्यकीय आरोग्य सेवा पुरविली जात आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेने शहरातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्यावर भर दिला आहे. शहरात विविध प्रकारच्या आरोग्य सेवा रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने वसई पारनाका येथे असलेल्या सर डी एम पेटिट रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
त्यानुसार सर डी एम पेटिट रुग्णालयाचे महापालिकेने विस्तार करून जुन्या रुग्णालयाच्या शेजारीच दोन मजली इमारत तयार करून त्यात आणखीन नवीन ७० खाटा त्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी ५ कोटी ३ लाख रुपये इतका निधी खर्च केला असून यात १५ खाटा रुग्ण नोंदणी, २५ खाटा सोमवारी या ७० खाटांची क्षमता असलेले नवीन रुग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथून ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
सर डी एम पेटिट रुग्णालयात ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी माजी आमदार राजेश पाटील, माजी महापौर प्रवीण शेट्टी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, प्रभारी शहरअभियंता प्रदीप पाचंगे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यासह वसईतील नागरिक व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
अशी आहे सुविधा
नवीन ७० खाटा या केवळ गर्भवती महिला व नवजात बालकांवरील उपचार यासाठी पालिकेने ठेवल्या आहेत. यात अति दक्षता शिशु विभाग १५ खाटा, लहान मुलांसाठी ५ खाटा आणि गरोदर माता प्रसूती साठी ५० खाटा असे नियोजन केले आहे.शस्त्रक्रिया कक्ष, तपासणी कक्ष , सोनोग्राफी यंत्रणा, बाळ रुग्ण चिकित्सा विभाग, प्रसूती पश्चात विभाग, नवजात बालक लसीकरण, औषध व्यवस्था व जन्म प्रमाणपत्र नोंदणी कक्ष अशा सोयीसुविधांयुक्त हे रुग्णालय तयार झाले असून आजपासून हे रुग्णांच्या सेवेसाठी सुरू झाले असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.
चोवीस तास आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न
सर डी एम पेटिट रुग्णालयात शहरातील नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः काही रुग्ण रात्री अपरात्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या रुग्णालयातच डॉक्टर निवासाची सुद्धा व्यवस्था केली जाईल जेणे डॉक्टर त्या ठिकाणी राहून रुग्णांना चांगली सेवा देता येईल असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.