वसई : वसई तालुका पंचायत समितीची जीर्ण झालेली इमारत खाली करून चार ते पाचवर्षे उलटून गेली आहेत.  मात्र अजूनही नवीन इमारत उभारण्याच्या कामाला गती मिळत नसल्याने कार्यालय रखडलेलेच आहे. वसई पश्चिमेच्या तहसिलदार कार्यालयाच्या समोर वसई पंचायत समितीचे कार्यालय आहे. हे कार्यालय २ हजार ९८८ चौरस मीटर क्षेत्रात विस्तारले आहे. यात आरोग्य, शिक्षण, पशु संवर्धन, ग्रामीण रोजगार, स्वच्छता, पाणीपुरवठा, खादी ग्रामोद्योग, लघुपाटबंधारे असे विविध विभागांची कार्यालये याठिकाणी होती. इमारत धोकादायक झाल्याने पाच वर्षांपूर्वी इमारत खाली करण्यात आली होती.

त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा कडून नवीन इमारत उभारली जाणार होती. यासाठी आरखडा ही तयार करण्यात आला होता. मात्र अजूनही या इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात न झाल्याने ते काम रखडलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.विविध आस्थापनांचा कारभार अपुऱ्या जागेत.इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीत असलेले विविध विभाग मागील बाजूच्या कार्यालयात हलविण्यात  आला आहे. 

हा कारभार अपुऱ्या जागेत चालविला जात आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, कृषी असे सर्वच विभाग विखुलेल्या अवस्थेत आहेत.

महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, फाईल ही ठेवण्यासाठीसुद्धा जागा नसल्याने एका एकावर एक रचून अगदी दाटीवाटीने ठेवली जात आहेत. अशा अडचणीत अधिकारी व कर्मचारी यांना बसावे लागत आहे. कामानिमित्त जे नागरिक येतात त्यांनाही बसण्यास जागा नसते अशी सद्याची परिस्थिती आहे.

नवीन इमारत उभारणीचा आरसीसी आराखडा तयार झाला आहे. तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.:- एकनाथ ठाकरे, प्रभारी उपविभागीय अभियंता (बांधकाम )