वसई: गेल्या काही दिवसांत शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे वसई-विरारच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या वेळीच पाऊस कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. अखेर शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर कृषिविकास खात्याकडून नुकसानग्रस्त शेतजमिनींच्या पंचनामे सुुरू केले आहेत.

वसई-विरारच्या ग्रामीण पट्ट्यात भातशेती, केळीची लागवड, तसेच विविध प्रकारची फुले आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, ऐन ऑक्टोबरमध्ये पिकांची कापणी सुरू असतानाच झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भातशेती आडवी झाली आहे, तर फुले आणि भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तसेच बोईसरचे आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या या मागणीची खात्यामार्फत पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी २१२ शेतकऱ्यांच्या ७८ हेक्टर शेतजमिनींचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तर उर्वरित सर्व नुकसानग्रस्त शेतजमिनींचे पंचनामे शुक्रवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी सांगितले आहे.