वसई: वसई विरार शहरात छठपूजेदरम्यान सूर्याला दाखविल्या जाणाऱ्या अर्ध्य देण्यासाठी नैसर्गिक तलवात पालिकेने परवानगी दिली आहे.मात्र या परवानगीनंतर शहरातून पालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.यापूर्वी झालेल्या गणेशोत्सव व नवरात्री उत्सवावेळी तलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता पालिकेकडून एकप्रकारे दुजाभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

२७ आणि २८ ऑक्टोबरला उत्तरभारतीय बांधवांचा छठपूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त समुद्र, तलाव, नदीकिनारे येथे जमा होऊन सूर्योदय आणि सूर्यास्तच्या कालावधीत पूजा केली जाते. पण, पूजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात यावी अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

मात्र छठ पुजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोताच्या ठिकाणी सूर्य देवतेला अर्ध्य दिला जातो. यासाठी पारंपारीक पद्धतीने छठ पूजा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत लोकप्रतिनिधीनी पालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार वसई विरार महापालिकेने नैसर्गिक तलावात अर्ध्य देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पालिकेच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून पालिकेच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र त्यावेळी न्यायालयाचे आदेश पुढे करून तलावात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. नवरात्री उत्सवाच्या दरम्यान ही हा निर्णय कायम ठेवला होता. मग आता न्यायालयाचे निर्देश असतानाही पालिका नियम डावलून नैसर्गिक तलावात पूजा करण्याची परवानगी देते. त्यामुळे गणेशभक्तांच्या सोबत पालिकेकडून दुजाभाव का केला जातो असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख राजाराम बाबर यांनी उपस्थित केला आहे. आम्ही छटपूजेच्या विरोधात नाही परंतु जो सण उत्सवात अशाप्रकारे भेदभाव करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सणांना कायद्याचे निर्बंध व उत्तर भारतीय सणांना मुभा देऊन हिंदू सणांमध्येच भेदभाव करण्याचे काम पालिका करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ढगे यांनी केला आहे. मतांच्या राजकारणासाठी असे निर्णय घेतले जात असल्याच्या प्रतिक्रिया ही नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे.