वसई: वसई विरार शहरात रिक्षाचालकांकडून केली जाणारी भाडेवाढ, विनामीटर चालवल्या जाणाऱ्या रिक्षा, तसेच मारामारीचे वाढते प्रकार त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. गुरुवारी महानगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लोकदरबारात यासंबंधी तक्रार नागरिकांनी केली. यावेळी अशा मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजून भर पडली आहे. पण, याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभी करून वाहतूक कोंडी करणे, कोरोनाकाळात केलेल्या भाडेवाढीनुसार भाडे आकारणे, रात्रीच्या वेळेस दुप्पट भाड्याची मागणी करणे, भाडे नाकारणे, तसेच प्रवाशांना धमकावणे अशा विविध समस्यांना प्रवाशांना दररोज सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी गुरुवारी महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लोकदरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तर नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले.
