वसई: मंगळवारी रात्रीपासूनच शहरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळू लागला आहे. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यात ७१ घरांचे नुकसान व ४० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

वसई-विरार परिसरात रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाच्या धारांमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.  विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी सखल रस्त्यावर पाणी साचण्यास साचले. पावसामुळे रस्त्यावर व मोकळ्या झोपड्याबांधून असलेल्या मजुरांची सामान आवरा आवर करण्यासाठी चांगलीच धावपळ झाली.

तर दुसरीकडे विविध ठिकाणच्या भागात रस्त्यावर झाडांच्या फांद्या, पत्रे, जाहिरात फलक पडझड झाल्याचे चित्र दिसून आले आहे. बुधवारी सकाळीही पावसाने किनारपट्टीसह वसई, नालासोपारा नायगाव , विरार या भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सकाळ सत्रात कामावर जाण्यास निघालेल्या नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.अनेक भागात ये जा करण्याच्या मार्गात पाणी साचल्याने त्यातून वाट करत स्टेशन गाठावे लागले. तसेच पावसामुळे नियमित वेळेत येणाऱ्या काही लोकल ही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने स्थानकात दाखल झाल्या असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

तसेच आतापर्यंत अवकाळी पावसामुळे शहरात ७१ घरांचे नुकसान झाले.  तसेच शहरातझाडे कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत.यात विरार रानपाडा, नायगाव कोळीवाडा, तामतलाव वसई,आनंद नगर गिरीविहार सोसायटी , चंद्रपाडा, यासह अन्य ठिकाणी एकूण ४० झाडे कोसळली तर तीन ठिकाणी लोखंडी जाहिरात कमानी कोसळल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. 

या घडलेल्या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून चाळी, घरे, यांचे पत्रे फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी ही झाडे विद्युत पोल वर पडल्याने बहुतेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी या पडलेल्या झाडांच्या फांद्या योग्य पद्धतीने छाटणी करून बाजूला केली असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आंबा , चिकू, जांभूळ, व केळीच्या बागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मीठ उत्पादक, वीट व्यवसायिक, मंडप डेकोरेटर, सुकी मासळी या हंगामी व्यावसायिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे.

विजेविना नागरिकांचे हाल

मंगळवारी रात्रीपासून वसई विरार शहरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. पाऊस सुरू होताच शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक वीज ग्राहकांना मंगळवारची पूर्ण रात्र ही विजेविना काढावी लागली आहे.तर बुधवारी सुद्धा अनेक ठिकाणी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे अनेकांच्या दैनंदिन कामावर याचा मोठा परिणाम झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

वादळीवाऱ्यामुळे काही ठिकाणी खांबावर व तारेवर झाडे कोसळण्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव ही वीज पुरवठा बंद ठेवला होता असे महावितरणने सांगितले आहे.

१) अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

:- डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई.

२) अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे विविध आपत्तीजनक घटना समोर येत आहेत. त्या घटनांवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज आहे. :- दिलीप पालव, अग्निशमन दलप्रमुख वसई विरार महापालिका