वसई: वसई विरार शहरात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. दैनंदिन साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचर्याचे साम्राज्य पसरले असून रोगराई पसरत आहे. यामुळे अखेर पालिकेने शहर स्वच्छतेबाबत कामचुकारपणा करणार्या आणि वारंवार संधी देऊनही कामात पारदर्शी व्यवहार न ठेवणार्या अनंत एंटरप्राईझेस या ठेकेदाराला अखेर काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
वसई विरार शहरात एकूण ९ प्रभाग आहेत. शहर स्वच्छतेसाठी २० भाग तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या ठेकेदारांना या प्रभागात दैनंदिन स्वच्छतेचे काम देण्यात आले आहेत. प्रभाग ए (बोळींज) सी (चंदनासार) आणि ई (नालासोपारा पूर्व) या प्रभागासाठी अनंत एंटरप्राईज या ठेेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. या विभागातील कचरा संकलन, व्यवस्थापन, गटार आणि रस्ते साफसफाईचे काम करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराकडून कामकाजात हलगर्जीपणा केला जात होता.
सफाई कर्मचार्यांना सुरक्षिततेची साधनेही देण्यात येत नव्हती. त्यांचे वेतन वेळेवर दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. त्याचा परिणाम दैनंदिन साफसफाईच्या कामावर होऊ लागला होता. यामुळे नागरिकांकडून खूप तक्रारी होत्या. अखेर पालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले आहे. आता त्या ठिकाणची स्वच्छतेची कामासाठी जबाबदारी दुसऱ्या ठेकेदाराकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
एकदा संधी दिली होती…
अनंत एंटरप्राईझेस या ठेकेदाराविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे ठेकेदाराला सफाई कामगार यांच्या कामकाज, गटारसफाई, आरोग्य विभाग, तसेच सफाईच्या संदर्भात वेळोवेळी तपासणी करून कळविण्यात आले होते. दैनंदिन साफसफाई होत नसल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आणि आंदोलनाची स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात आणून दिले होते. वारंवार सूचना देण्यात येत होत्या. मात्र काही सुधारणा झाली नव्हती. ठेकेदाराच्या कामामध्ये सतत ढिसाळपणा दिसून आलेला आहे. तसेच ठेकेदाराचा मनमानी व ढिसाळ कामकाज सुरूच असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आहे.
आम्ही ठेकेदाराला वारंवार सूचना दिलेल्या होता. मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कामामध्ये ढिसाळपणा कायम होता. त्यामुळे आम्ही अनंत एंटरप्राईझ या ठेकेदाराचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकले आहे. – संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका
