वसई विरार : शहर हे गजबजलेले, वरकरणी सुंदर दिसणारे असले तरी आता शहरात वावरताना नागरिकांना विविध धोक्यांचा सामना करावा लागतो. धोकादायक अवस्थेत असलेल्या जीर्ण इमारती, रस्त्यांच्या गटारांवरील उघडी झाकणे, महावितरणाचे धोकादायक मीटर बॉक्स, लोंबकलणाऱ्या विजेच्या तारा, धोकादायक झाडे, विविध ठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे, गतिरोधकांवर मार्गदर्शक पट्ट्यांचा अभाव यामुळे सतत अपघाताच्या घटना समोर येत असतात. यामुळे जागोजागी विविध प्रकराच्या धोक्यांना, संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शासन स्तरावरून या महत्वाच्या गोष्टींकडेही लक्ष दिले जात नसल्याने अनेक नागरिक निष्क्रिय व्यवस्थेचे बळी ठरत आहेत. यामुळे वसई विरार हे धोक्याचे शहर झाले आहे.

नागरिकांना जागोजागी विविध प्रकराच्या धोक्यांना, संकटाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे हे महापालिका व अन्य शासकीय यंत्रणांचे कर्तव्य आहे. परंतु नागरिकांना अशा मुलभूत सोयीसुविधांसाठी सातत्याने झगडावे लागत आहे. त्याहीपेक्षा भयंकर बाब म्हणजे वसई विरार शहरातील नागरिकांना धोकादायक वातावरणात जगावे लागत आहे.

वसई विरार शहराचे नागरीकरण अलीकडच्या काळात बेसुमार वाढले आहे. सद्यस्थितीत या शहराचे नियोजन करणेही एक प्रकारे कठीण होऊन बसले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे विविध प्रकारच्या समस्या ही उदभवू लागल्या आहेत. अनेकदा एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होते. अशावेळी लेखापरीक्षण, मदत, दुरुस्ती, चौकशी अशा बाबींकडे तात्पुरता लक्ष दिले जाते. मात्र अशा घटना भविष्यात घडू नये किंवा अशा घटना टाळता याव्यात यासाठी ठोस अशा उपाययोजना आखल्या जात नाहीत. दुर्दैवाने तसे होत नसल्याने वसई विरार शहरातील अनेक समस्या कायम आहेत. या समस्या म्हणण्यापेक्षा खरं तर हे धोकेच आहेत.

शहरातील नागरिकांना  शहरात वावरत असताना विविध ठिकाणी  धोकादायक वातावरणात राहावे लागत आहे. आजही शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारती आहेत. अशा धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींमध्ये नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागते. काही वेळा जीर्ण इमारतींचा स्लॅब कोसळणे, इमारत कोसळणे अशा धक्कादायक घटना ही समोर येत असतात. नुकताच नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथील साई राज अपार्टमेंट ही पंधरा वर्षे जुनी असलेली इमारत भर पावसात कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या इमारतीचा धक्का शेजारील कुसूम अपार्टमेंट व नरेंद्र माऊली या इमारतींना ही बसला. यामुळे या इमारती सुद्धा पालिकेला जमीनदोस्त कराव्या लागल्या. तसेच विरारच्या गोपचर पाडा, एमबी इस्टेट या भागात इमारतींचा स्लॅब कोसळून दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा घटनांनंतर ही प्रशासन कोणताच धडा घेताना दिसून येत नाही.

तर दुसरीकडे शहरातील गटारांची अवस्था ही फारच बिकट आहे. बहुतांश भागात गटारांची झाकणे अद्यापही उघडी व तुटलेल्या अवस्थेत तर काही ठिकाणी गटारावर टाकण्यात आलेले स्लॅब ही अक्षरशः कमकुवत झाले आहेत. अशा ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका कायम आहे. या उघड्या गटारांच्या झाकणांमुळे आतापर्यंत गटारात पडून मृत्यू, जखमी होण्याच्या घटना घडल्या आहे. केवळ मनुष्यच नव्हे तर मुकी जनावरेही या उघड्या गटारात पडून अडकून राहिल्याचे प्रकार घडले आहेत. यावरूनच शहरातील उघड्या गटारांपासून असलेला धोका किती गंभीर आहे हे लक्षात येईल. तसेच शहरातील रस्त्यांची अवस्था ही फारच बिकट आहे.

रस्ते तयार करणे व दुरुस्ती करणे यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. इतक खर्च करूनही जागोजागी पडलेले खड्डे यावरुनच रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याचे दिसून येत आहे..तसेच सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेतर्फे विविध ठिकाणच्या रस्त्यावर गतीरोधक तयार केले आहेत. मात्र तयार केलेल्या गतीरोधकांवर मार्गदर्शक पट्टे नसल्याने रात्रीच्या सुमारास प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या गतीरोधकांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. तर गाड्या या गतीरोधकावरून उडून झटका बसत असल्याने नागरिकांची वाहनांसह हाडे ही खिळखिळी होऊ लागली आहेत.

वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचा निष्काळजीपणाचा प्रत्यय ही अनेकदा नागरिकांना येत असतो. सुरक्षित व सुरळीत वीज पुरवठा या गोष्टीला महावितरणने प्राथमिकता द्यायला हवी परंतु दोन्ही गोष्टींच्या बाबतीत महावितरणचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्याचाच प्रत्यय अपघातासारख्या घटनांमधून येत आहे.या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ३० मे रोजी विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे वीज रोहित्र दुरुस्तीचे काम करताना जयेश घरत या महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर २४ मे रोजी वसईच्या मर्सेस येथे महावितरणची विद्युत तार शेतात तुटून पडली होती. त्यात २२ वर्षीय सूरज कुमार याला जीव गमवावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसईच्या देवतलाव येथे विद्युत खांबातून वीज प्रवाहित झाल्याने दोन दुभत्या मेंढ्यांचा मृत्यू झाला. विरार मध्ये विद्युत वाहक तार तुटून शेतात पडल्याने चरण्यासाठी गेलेल्या गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यापूर्वी सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने अशा घटनां समोर येत आहेत. मात्र महावितरण आपली वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जाते. आजही उघड्या वीज पेट्या, नागरी वस्तीत असलेले रोहित्र, लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, जीर्ण झालेले खांब असे मृत्यूचे सापळेच जणू ठिकठिकाणी शहरात दिसत आहेत. या धोक्यांकडे प्रशासन व महापालिका यांचे दुर्लक्ष होत असल्याने याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शासनाने आता तरी गांभीर्याने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात निर्माण होणारे धोके टाळता येतील.