वसई विरार शहराचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरात विजेची मागणीही वाढू लागली आहे. वाढत्या वीज मागणीमुळे महावितरणनेही शहरात आपला वीज विस्तार वाढविला आहे. शहरात महावितरणचे साडेदहा लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर) बसविले आहेत. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार शहरात ५ हजार ८४६ इतकी रोहित्र आहेत. त्यातून त्या त्या भागातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा होत आहे. मात्र शहरातील रोहित्रांच्या सुरक्षितेचा विचार होताना दिसत नाही. यामुळे धोकादायक असणाऱ्या रोहित्रांवर वेळीच उपाययोजना न केल्याने शहराच्या विविध भागातून अशा धोकादायक रोहित्रांमुळे घडणाऱ्या दुर्घटना समोर येऊ लागल्या आहेत.

नुकताच नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी परिसरात रोहित्रांचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीचा भडका आजूबाजूला पसरल्याने अंगणात खेळत असलेली सहा वर्षीय चिमुकली व त्या भागात काम करीत असलेला तीस वर्षीय तरुण या दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यापूर्वी सुद्धा उघड्या रोहित्रांचा धक्का लागून अनेकांचे बळी गेले आहेत. असे असतानाही महावितरण याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस रोहित्रांचा धोका वाढू लागला आहे.

शहरात अनेक धोकादायक रोहित्र असून त्यामुळे नागिरकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. महावितरणाच्या गलथान कारभाराचा फटका वसई विरारच्या नागरिकांना बसत आहे. तसेच जागोजागी असलेल्या उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुद्धा धोकादायक झाले आहे. महाविरणाचा बेजबाबदार कारभार आणि अक्षम्य दिरंगाईमुळे उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या रोहित्रांमुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या सर्व रोहित्रांना तातडीने सुरक्षा कवच (सेफ्टी बॉक्स) बसवावेत अशी मागणी वारंवार शासनाकडे करण्यात येते मात्र त्याकडेही फारसे लक्ष दिले जात नाही.

महावितरणची अनेक रोहित्र ही रहदारीच्या ठिकाणी आहेत. तेथून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, शाळकरी विद्यार्थी ये जा करीत असतात. तर काही ठिकाणी रोहित्राच्या खाली काहींनी टपऱ्या, उपहारगृह उभारली आहेत. यामुळे दुर्घटनांचा धोका अधिकच वाढला आहे. अशा ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात अशा वेळी एखादी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी वसई पश्चिमेला असणाऱ्या अंबाडी येथील भाजी मंडईमध्ये रोहित्राला भीषण आग लागली होती. सुदैवाने ही आग त्या ठिकाणी रहदारी व बाजार भरलेला नसताना लागल्याने मोठा अनर्थ टळला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर रहदारी असणाऱ्या रस्त्यांवरील धोकादायक स्थितीत असलेल्या रोहित्रांच्या ठिकाणी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ती दुर्घटना घडू नये यासाठी महावितरणने प्रयत्न करायला हवेत तरच भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

रोहित्रांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या रोहित्रांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. अनेक ठिकाणी रोहित्राच्या ठिकाणी झाडेझुडपे, प्लास्टिक कचरा साचून असतो. अनेकदा रोहित्राच्या जवळच्या भागातील डिओमधून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत असतात. अशा वेळी आगीच्या ठिणग्या कचऱ्यावर पडल्यास त्या परिसरातील आग भडकून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यासाठी रोहित्र असणारे परिसर नियमित स्वच्छ केले जाण्याची आवश्यकता आहे.

फायबर संरक्षण जाळ्यांचा प्रस्ताव बारगळला

शहरात महावितरणने सार्वजनिक गर्दीच्या, रस्त्याच्या बाजूला, दाट वस्तीत, बाजारपेठांमध्ये आदी ठिकाणी रोहित्र बसविली आहेत. काही ठिकाणी महावितरणने वीजसुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत. अनेकदा या लोखंडी जाळ्या गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरीद्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत. यामुळे लोखंडी कुंपणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणला सातत्याने उपाययोजना करावी लागत होती. तर काही भागात संरक्षक जाळ्या नसल्याने रोहित्र ही उघड्या अवस्थेत आहेत. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून आता लोखंडाऐवजी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचा पर्याय वापरून फायबर प्लॅस्टिकच्या संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही मोजकी ठिकाणे वगळता अन्य ठिकाणी अजूनही अशा जाळ्या बसविल्या नाहीत.

पावसाळ्यात धोका अधिक

पावसाळ्याच्या दिवसात शहरातील उघड्या, नीटपणे बंदिस्त नसणाऱ्या रोहित्रांचा धोका अधिक वाढतो. अनेकदा रोहित्र असणाऱ्या परिसरात पावसाचे पाणी साचते. तसेच या दिवसात विद्युत वाहिन्यांवर होणाऱ्या परिणामांमुळे रोहित्रांशी संबंधित धोके अधिक वाढतात. अशा वेळी पाणी आत जाऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता अधिक असते. शहरात गेल्या काही वर्षात पूरपरिस्थिती होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा पावसाळ्यात रोहित्रांमध्ये बिघाड झाल्यास वीज कर्मचाऱ्यांना देखील आपला जीव धोक्यात घालून दुरुस्ती करावी लागते. अशावेळी रोहित्रे पाण्यापासून योग्य अंतरावर असायला हवीत.

सुरक्षा तपासणी आवश्यक

रोहित्रांमुळे दुर्घटना घडू नयेत यासाठी दर सहा महिन्यांनी महावितरणकडून शहरात असणाऱ्या रोहितांची सुरक्षा तपासणी आवश्यक आहे. यामुळे चाचणी अहवालातून प्रत्येक रोहित्राच्या सुरक्षेविषयी माहिती उपलब्ध होऊ शकते. यामुळे यंत्रणांमध्ये बिघाड असल्यास ते वेळीच दुरुस्त करता येणे शक्य आहे. यामुळे दुर्घटना होण्याच्या शक्यता कमी होतात. तसेच यामुळे वीज कर्मचाऱ्यांना देखील देखभाल नियोजनासाठी वेळ मिळून इतर वेळी त्यांच्यावर येणारा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे नागरिकांच्या सुरक्षितलेला प्राधान्य मिळून रोहित्रांविषयी समस्यांना काही प्रमाणात आळा घालता येणे शक्य आहे.