वसई: नालासोपाऱ्यात अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने अमली पदार्थ तस्करीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
शनिवारी रात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानाजवळ ३ व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा २ च्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्या कडे २५० ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अमलीपदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे.
शहबाज हमिद शेख (२२), योगेश राजू राठोड (२२) व जाफर आसिफ शेख (२२) अशी अटक आरोपींची नाव असून जप्त केलेला अमली पदार्थ ५० लाख रुपये किंमतीचा आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणामकरणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस अॅक्ट) कलम ८ (क), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई गुन्हे प्रकटिकरण शाखा-२ वसई कक्षाचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे,सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी आदींच्या पथकाने केली आहे.