वसई विरारचा परिसर हा निसर्गरम्य असा परिसर आहे. या परिसराला लागूनच मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा आहे. त्यात विशेषतः तुंगारेश्वर या संरक्षित अभयारण्याचा समावेश आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्य, विविध प्रकारचे पशु पक्षी, विविध प्रजातींची दुर्मिळ वृक्ष अशा वनसंपदेने नटलेला होता.

वसईच्या पूर्वेच्या बाजूला असलेल्या डोंगर रांगा व त्याठिकाणी असलेले जंगल हे वाढती वृक्ष तोड, अतिक्रमण, जंगलाला आगी लावण्याचे प्रकार अशा प्रकारामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे.

दरवर्षी वसई विरार पूर्वेच्या भागातील जंगलपट्ट्यात आगी लागण्याच्या घटना समोर येत असतात. विशेषतः या आगी मानवनिर्मित असून शिकारीसाठी आगी लावल्या जात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. या वाढत्या आगीच्या घटनांचा मोठा परिणाम वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर झाला आहे. आणि परिणामी वन्यजीवनच धोक्यात आले आहेत. आगीच्या भीतीने अनेक वन्यप्राणी हे सैरावैरा होऊ मानवी वस्ती असलेल्या ठिकाणीसुद्धा घुसू लागले आहेत.

हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता

दुसरीकडे बेसुमार जंगलतोड होऊ लागली आहे. वन परिक्षेत्रात वन तस्करांबरोबर भूमाफियांच्या बेकायदा बांधकामांनी देखील डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्याजागी मातीभराव करून बेकायदा बांधकामं जोर धरू लागली आहेत. त्याविरोधात वन अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. याशिवाय वन क्षेत्रात असलेले धबधबे, नव्याने निर्माण होत असलेली छोटी छोटी आश्रम, मंदिर असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटकांसोबत येत असलेल्या गाड्या त्या मार्फत होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण याचा परिमाण थेट पक्ष्यांवर आणि प्राण्यांवर होतो. मोठ्या आवाजाने तर वन्यजीव आपण असुरक्षित असल्याचे जाणवून रस्त्यावर उतरतात आणि कधी कधी आपला जीव देखील गमावतात. जिथे वन्य प्राण्यांचा अधिवास आहे अशाच ठिकाणी जर असे सर्व प्रकार सुरू झाले तर वन्य प्राणी जाणार तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अनेकदा वन्य प्राणी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील वर्षी विरार कोपर, भाताणे, वैतरणा अशा जंगलपरिसराच्या लगतच्या भागात बिबट्याचा वावर सुरू झाला होता. त्यावेळी दुभती जनावरे, घरा समोर असलेले श्वान यांचा फडशा पाडल्याचे प्रकार घडले होते.

आता हे वन्य प्राणी केवळ जंगलपट्ट्यालगतच्या भागापुरते मर्यादित न राहता थेट शहरी भागाजवळसुद्धा शिरकाव करीत आहेत. काही दिवसांपासून वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे. वन्य प्राणी आता थेट मानवी वस्तीकडे वळत असल्याने ही एकप्रकारे धोक्याची घंटा आहे. जंगलातील सर्व वनसंपदा नष्ट केली जात असल्याने हे प्राणी जाणार तरी कुठे ? जंगलात दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे पाण्याचे असलेले नैसर्गिक जलस्त्रोतसुद्धा आता नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधातसुद्धा प्राणी नागरी वस्तीत येऊन अडकतात. वन्यजीवांचे अस्तित्व ही कमी होऊ लागले आहे. अनेकदा वन्य प्राणी नागरीवस्तीत शिरून दहशत निर्माण करतात. आताच जर अशा प्रकारांना आळा घातला गेला नाही तर भविष्यात याचे दूरगामी परिणाम जीवसृष्टीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय विकास साधत असताना पर्यावरणाचाही विचार होणे गरजेचे आहे. यात विशेषतः पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना अशी क्षेत्रसुद्धा टिकविण्याकडे पाठ फिरवली जाऊ लागली आहे. याचाच मोठा परिणाम सर्वत्र दिसून येऊ लागला आहे.

हेही वाचा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

वन्यजीवांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. जंगल पट्टा व प्राण्यांच्या अधिवासात असलेली मानवाची घुसखोरी वेळीच थांबवली नाही तर येत्या काळात या घुसखोरीचे परिणाम आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

इको सेन्सेटिव्ह झोनकडे दुर्लक्ष

संरक्षित वनाचे संवर्धन व्हावे व येथील वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानांच्या सभोवताल क्षेत्र इको सेन्सेटीव्ह झोन घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वसईतील तुंगारेश्वर अभयारण्य व त्या लगतचा परिसर इको सेन्सेटिव्ह म्हणून घोषित केला. परंतु त्यानंतर या क्षेत्राच्या देखभाल व त्यांचे संवर्धन करण्याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने मागील काही वर्षांपासून तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीलगत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढू लागले आहे. प्रदूषण पसरविणारे कारखाने उभारल्याने याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. तर दुसरीकडे भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या चाळींच्या वनहद्दीलगतच्या वाढत्या संख्येमुळे लोकांचा थेट वावर जंगलात होऊ लागला आहे. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.