वसई: वसई विरार शहराला जोडणारा एव्हरशाईन- अंबाडी पूल रस्त्यांची उंची वाढवून अवघ्या वर्षभराचा कालावधी झाला आहे. मात्र वर्षभरातच या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितची समस्या निर्माण होत आहे. दरवर्षी या पूरस्थितीमध्ये अंबाडी ते एव्हरशाईन हा रस्ता सुद्धा पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प होते. ही समस्या सुटावी यासाठी महापालिकेने एव्हरशाईन ते अंबाडी पुला पर्यँतचा रस्त्याची उंची वाढवून नवीन रस्ता तयार केला आहे. या रस्त्याच्या कामाचा ठेका मे जैन कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आला होता.
या रस्त्याची उंची एक मीटर ने वाढवून त्यावर खडीकरण डांबरी करण करण्यात आले आहे. यासाठी साडेसात ते आठ कोटी रुपये इतका निधी खर्च केला होता. मात्र इतका निधी खर्च करूनही अवघ्या वर्षभरातच रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. काम झाल्यानंतर त्या रस्त्याचे देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. असे असतानाही ठेकेदार रस्ते दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलीस वाहतूक शाखा मधूबन, उघाडी क्रमांक १, वसंत नगरी सिग्नल कडे जाताना, वसंत नगरी सिग्नल, उघाडी क्रमांक ३ , उघाडी क्रमांक ४ वसई पूर्व पश्चिम पूल मार्ग अशा ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
पालिकेने रस्ता तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये निधी खर्च केला आहे. मात्र अवघ्या वर्षभरातच त्याची अवस्था बिकट झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वसई विरार शहराच्या प्रमुख भागाला जोडणारा रस्ता दररोज येथून लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात असे असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिकेने तातडीने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पालिकेच्या नोटिशीला केराची टोपली
रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनीचे असल्याने संबंधित ठेकेदाराला पालिकेने नोटीस याशिवाय स्मरणपत्र ही दिले आहे. आतापर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत १२ नोटीस बजावल्या आहेत. त्यात रस्ते दुरूस्त करण्याच्या सूचना पालिकेचे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी दिल्या होत्या. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घडणाऱ्या अपघाताची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र त्याकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने अजूनही या रस्त्याची डागडुजी झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करणार
ज्या ठेकेदाराला काम दिले होते. त्याने त्या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.याबाबत सातत्याने आम्ही नोटीस बजावणे, तोंडी सूचना ही केल्या आहेत. आता आणखीन एक नोटीस बजावली जाईल. त्यावर ही त्यांनी कोणतेच काम केले नाही तर त्यांच्यावर नियमानुसार काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल असे पालिकेचे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे.
