वसई विरार शहरात दळणवळणांसह विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. यात विशेषतः रेल्वे उड्डाणपूल, रिंगरूट, सॅटिस प्रकल्प,सुसज्ज रुग्णालये यांसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. याआधी घोषणा करण्यात आलेलेच प्रकल्प अजून मार्गी लागले नसून त्यातच आता उत्तन सागरी सेतू प्रकल्पाची घोषणा झाली आहे. शहरात नव्या प्रकल्पांची भर घातली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत अशा प्रकल्पांच्या घोषणा होत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा ही अपुऱ्या पडू लागल्या आहे. विशेषतः शहरात वाढत्या वाहनांची संख्या व अरुंद रस्ते यामुळे दैनंदिन दळणवळणाचा मोठा प्रश्न शहरात निर्माण झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका व राज्य शासनाकडून विविध प्रकल्पांची घोषणा केली आहे. मात्र हे प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने आजही शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी झाली आहे. वसई विरार शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सुटावी, नागरिकांना विना अडथळे प्रवास करता यावा यासाठी विविध प्रकल्प नियोजित केले आहेत. यात प्रामुख्याने रिंगरूट प्रकल्पाचा समावेश होता.

विशेषतः हा प्रकल्प पालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असून यात ४ शहरे आणि २२ गावांना एकाच रस्त्याने रिंगरूट प्रकल्पाने जोडले जाणार आहे. यासाठी ४० मीटर रुंदीचा आणि ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प २००७ साली सिडकोने नियोजित केला होता. पालिकेच्या स्थापनेनंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असे वाटले होते. मात्र सर्वेक्षणाच्या व्यतिरिक्त आणखीन प्रभावी अंमलबजावणीच झाली नसल्याचे तो ही प्रकल्प रखडलेलाच आहे.

वसई विरार शहरात पूर्व पश्चिम दिशेने प्रवास करण्यासाठी नायगाव ते विरारपर्यंत चार उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. वाढत्या वाहनांच्या रहदारीमुळे ते सुद्धा अपुरे पडत आहेत. यासाठी चार नवीन रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. यात उमेळमान (वसई), ओस्वालनगरी (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपूलांचा समावेश आहे. त्या पुलांच्या कामाला गती मिळत नसल्याने ते सुद्धा केवळ कागदावरच राहिले आहेत.

तर दुसरीकडे विरारमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन शहरातील दळणवळण सुलभ व्हावे तसेच नारींगी रेल्वे फटकातील वाहतूक बंद व्हावी यासाठी नारिंगी उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पाच वर्षाहून अधिक काळ गेला तरी ते काम मार्गी लागले नाही. तशीच काहीशी गत नायगाव पूर्वेच्या जूचंद्र उड्डाणपुलाची होऊन बसली आहे. जूचंद्र येथे सुद्धा रेल्वे फाटकावर उड्डाणपूल निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. २०१९ पासून या पुलाचे काम सुरू आहे. हा पूल डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केला जाईल असे सांगण्यात आले होते.

कामातील दिरंगाईमुळे २०२५ हे वर्ष ही संपत आले तरीही पुलाचे काम पूर्णत्वास गेले नाही. रस्ते दुरुस्ती व रुंदीकरण अशा कामातही दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रवास सुलभ व्हावा यासाठी प्रकल्प नियोजित केले जातात. मात्र त्याची प्रभावी अंमलीबजावणी होत नसल्याने वर्षानुवर्षे असे प्रकल्प रखडत आहेत. त्याचाच त्रास हा येथील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. जुने प्रकल्प मार्गी लागले नसतानाच उत्तन विरार सागरी सेतू यासह अन्य मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा होत आहेत.

भविष्याच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प महत्वाचे वाटत असले तरी सद्यस्थितीत जे प्रकल्प नियोजित आहेत त्यांचे काय होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आधी रखडलेले प्रकल्प व पायाभूत सुविधा आहे ते पूर्ण करण्यास प्राधान्य द्यायला हवे.केवळ प्रकल्प हे निवडणुकीचा मुद्दा न ठेवता प्रत्यक्षात ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असायला हवेत तरच येथील दळणवळणासह इतर समस्या मार्गी लागण्यास मोठी मदत होईल…

वाहतूककोंडी समस्या गंभीर

अपूर्ण असेलेले प्रकल्प, रस्त्यांची दुरवस्था आणि उड्डाणपुलांची कमतरता यामुळे आता शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होताना दिसते आहे. विशेषकरून सणासुदिच्या काळात शहरात अंतर्गत प्रवास करण्यासाठी अनेकदा वाहनचालकांना दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. शहरात वाहनांची संख्या वाढली आहे मात्र वाहनतळ उपलब्ध नसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखीनच भर पडताना दिसत आहे. रिंगरूट प्रकल्प, नवे उड्डाण पुल या कामांची अजून सुरुवात देखील झाली नाही. हे प्रकल्प पूर्ण होण्यास कमीत कमीत चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करता वाहतूक संबंधी विकास कामे तातडीने होणे अपेक्षित आहे अन्यथा वाहतूक कोंडी ची समस्या भविष्यात गंभीर होऊ शकते.

प्रशासन स्तरावर उदासीनता

अनेक प्रकल्पांना निधी मंजूर झाला आहे, काही प्रकल्पांसाठी जागा हस्तांतरित करण्याचे काम सुरु आहे. असे जरी असले तरीही एकंदरीतच प्रशासन स्तरावर विकास प्रकल्पांना प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. असे अनेक प्रकल्प प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पूर्णत्वास जात नाही. अनेकदा प्रकल्प अधिकारी, शासकीय अधिकऱ्यांच्या बदल्या अशा कारणांमुळे देखील प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत असतो. यासाठी अपूर्ण असलेले प्रकल्प का पूर्ण होत नाही, त्याच्या असेलेल्या अडचणी याबाबत अभ्यास करून असे प्रकल्प तातडीने मार्गी लावायला हवेत. जनतेकडून करवसुली केली जाते मात्र अनेकदा प्राथमिक पण महत्वाच्या म्हणता येतील अशा नागरी सुविधांचाही शहरात अभाव असतो. एकीकडे सागरी सेतू, मेट्रो आणि इतर प्रकल्पांची स्वप्ने शहरवासियांना दाखवली जात असतात शहरात सध्या असेलल्या सुविधांची पाटी कोरीच असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे.

रुग्णालयांच्या कामाला गती हवी

वसई विरार शहरात सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नसल्याने आजही मोठं मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिकांना मुंबई, ठाणे अशा ठिकाणी धाव घ्यावी लागते. यासाठी पालिकेने आचोळे येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मागील काही वर्षांपासून विविध प्रकारच्या अडचणीमुळे रुग्णालयाचे काम मार्गी लागले नव्हते. आता जागेचा ही तिढा सुटला असून प्रत्यक्षात जागा ही पालिकेच्या नावी झाली आहे. परंतु या रुग्णालयाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे नवघर उपजिल्हा रुग्णालय, खानिवडे ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयांची कामे ही विहित वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णालयाच्या केवळ घोषणाच राहण्याची शक्यता आहे.