वसई: वसई विरार शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून गॅरेज चालकांकडून दुरुस्तीची कामे केली जात आहे. यामुळे दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्या रस्त्याच्या मध्येच लावून दुरुस्त केल्या जात असल्याने रहदारीसाठी अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
वसई, विरार , नालासोपारा येथील सर्वच ठिकाणच्या मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने दुरुस्त करणाऱ्या गॅरेज वाल्यांनी अतिक्रमण केले आहे.यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.त्यामुळे तीन व दोन पदरी असलेले रस्ते हे एक ते दीड पदरी झाले आहेत. वसईतील वसई पूर्व स्टेशन रोड, वसई १००फुटी रस्ता , दिवाणमान , नालासोपारा श्रीप्रस्थ, नालासोपारा पोलीस ठाण्याच्या समोर, नालासोपारा पश्चिम सेंट्रल पार्क, प्रगती नगर, संयुक्त नगर, आचोळे रोड यासह विविध ठिकाणच्या भागात मुख्य रस्त्यावर वाहने दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
वसई विरार शहरातील वाहतूककोंडी हा सर्वात जटील प्रश्न आहे. अरुंद रस्ते आणि त्यावरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून रहदारीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. यातच गॅरेज चालकांनी दुकानाच्या समोरील रस्ता व्यापून जागा काबीज केली आहे. न रस्त्यावर गाड्यांच्या दुरुस्तीच्या दरम्यान वापरण्यात येणारे ऑइल, नटबोल्ड , वायर, व इतर टाकाऊ वस्तू रस्त्यावरच टाकून दिल्या जात असल्याने रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. या रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे दुचाकी स्वार घसरून पडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यासाठी अशा जागा अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या गॅरेज चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. अशा गॅरेज चालकांच्या विरुद्ध वेळोवेळी कारवाई केली जाते असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.
पार्किंगच्या जागांवर अतिक्रमण
शहरात आधीच वाहन पार्क करण्याच्या जागांवरून वाद सुरु असताना. गॅरेज चालकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे यात अधिकच भर पडली आहे. अनेक ठिकाणी वाहन पार्क करण्याचा ठिकाणांना लागूनच ही दुरुस्तीची दुकानं आहेत. त्यामुळे बऱ्याचदा गॅरेज चालक दुरुस्त केलेले वाहन या ठिकाणी उभं करतात आणि जागा अडवतात, अशी तक्रारही नागरिक करत आहेत.