वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात शेकडो गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यांची कामे ही वेगाने सुरू आहेत.असे जरी असले तरीही अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षा नियमांना तिलांजली दिली जात आहे.यामुळेच शहरात विविध दुर्घटनेत मजूर कामगारांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे मजूरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई उपनगराला लागून वसई विरार शहर असल्याने मागील काही वर्षात शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्याच वेगाने शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत.मात्र त्या इमारतींचे निर्माण करताना विकासक व ठेकेदार नियुक्त केलेल्या मजुरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नसल्याचे विविध घटनांमधून समोर येत आहे. नुकताच विरार पश्चिमेच्या भागात निर्माणाधिन असलेल्या इमारतींवरून खाली पडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात विरार पश्चिमेच्या ग्लोबल सीटी परिसरात बचराज लिजेंड इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी मारण्यासाठी केलेल्या मजूर खाली पडून मृत झाला तर यापूर्वी गोकुळ टाऊनशीप विनय युनिक ( स्काय ) इमारतीच्या १३ व्या लिफ्टच्या डक्ट मध्ये पडून मृत्यू झाला. विशेषतः या मृत्यू झालेल्या मजुरांना ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने दिली नसल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
एका आठवड्यात दोन मजुरांचा सुरक्षा साधनाविना व नियमांचे पालन न केल्याने मृत्यू झाला आहे. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा गृहनिर्माण प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.खरं तर महापालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. अशा सर्वच प्रकल्पाची पाहणी करून जिथे सुरक्षा नियम पाळले जात नसतील अशा ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
परवानगी देता वेळीच सूचना दिल्याचा दावा
शहरात उभ्या राहणाऱ्या मोठं मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानग्या दिल्या जातात. परवानगी देताना सुरक्षा विषयक सूचना दिल्या जातात. सर्व कामगारांनी हेल्मेट, सुरक्षा चष्मा, हातमोजे आणि स्टील-टो बूट, सेफ्टी बेल्ट, यांसारखी योग्य उपकरणे नेहमी वापरावीत. उंचीवर काम करताना पडण्यापासून बचाव करण्यासाठी योग्य सुरक्षा साधनांचा वापर करावा. अशा सूचना केल्या जात असल्याचा दावा महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
निष्काळजी पणा केल्यास गुन्हे दाखल
विरार मध्ये आठवडा भरात दोन मजूरांचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. दोन्ही घटनांमध्ये ठेकेदाराकडून होत असलेला निष्काळजीपणा झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
इमारती वरून पडून घडलेल्या घटना
४ नोव्हेंबर २०२५ रोजी विरार पश्चिमेच्या ग्लोबल सीटी परिसरात बचराज लिजेंड इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून उपेंद्र कुंद (१९) या मजुराचा मृत्यू.३०ऑक्टोबर २०२५ रोजी विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप विनय युनिक ( स्काय ) इमारतीच्या १३ मजल्यावर बांबू बांधण्याचे काम करीत असताना लिफ्ट च्या डक्ट मध्ये पडून जिंदप्पा माला (४७) या मजुराचा मृत्यू.
