वसई: बुधवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या गणेशोत्सवाचे रंग शहरात सर्वत्र उमटले असून उत्सव साजरा करण्यासाठी वसई विरार व मीरा भाईंदर शहर सज्ज झाले आहे. मंगळवारी दिवसभर शहरात गणपती आगमन मिरवणूकीची लगबग पाहायला मिळाली. शहरात घरगुती व सार्वजनिक अशा सुमारे ५५ हजार ६०१ ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.

यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात आणि उत्साहाने साजरा होणार असल्याने वसई विरार मीरा भाईंदर यासह राज्यभरातील गणेश भक्त मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. मागील काही दिवसांपासूनच बाप्पाच्या आरास सजावटीसाठी लागणारे साहित्य, पूजापाठ साहित्य, फुलांची खरेदी, नैवेद्य, हारफुले अशा विविध प्रकारच्या साहित्यांनी बाजार पेठा फुलून गेल्या आहेत.

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांतही आठवडा भरापासूनच गणपती बाप्पांचा आगमन सोहळा सुरू झाला होता. याशिवाय मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असली घरगुती गणपतीचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

यावर्षी वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५४ हजार ४० घरगुती व १ हजार ५६१ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून यंदा दरवर्षीपेक्षा अधिक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

फुल बाजारात गर्दी

लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी वसई विरार मध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. विशेषतः फूलबाजारात विविध फुलांच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली. फुलबाजारात प्रामुख्याने पिवळा झेंडू, भगवा झेंडू, कलकत्ता झेंडू, शेवंती, गुलछडी, गुलाब, ऑर्किड आणि अष्टर अश्या विविध जातीच्या फुलांसह दुर्वा, केवडा पाती, बेल, तुळस, केळीचे खांब, आंब्याच्या डहाळ्या अशा गणपतीसाठी लागणाऱ्या इतर वस्तूही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. हा फुलबाजार विविध रंगी फुलांनी आणि ग्राहकांनी अक्षरशः बहरून गेला आहे.