वसई : वसई विरार शहरात छठ पूजेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी झालेल्या बैठकीत छठपूजेदरम्यान दिलेल्या सूर्याला दाखविल्या जाणारा अर्ध्य देण्यासाठी केवळ नैसर्गिक तलावात परवानगी देण्यात आली आहे.
येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला छठपूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त समुद्र, तलाव, नदीकिनारे येथे जमा होऊन सूर्योदय आणि सूर्यास्तच्या कालावधीत पूजा केली जाते. पण, पूजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होऊ नयेत म्हणून कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र छठ पुजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोताच्या ठिकाणी सूर्य देवतेला अर्ध्य दिला जातो. यासाठी पारंपारीक पद्धतीने छठ पूजा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत आमदार स्नेहा दुबे- पंडित, आमदार राजन नाईक यासह विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत ही मागणी पालिकेकडे करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मुख्यालयात महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी बैठक घेतली यावेळी पोलीस अधिकारी, विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत न्यायालयाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करूनच छठ पूजा साजरी करता येणार असल्याचे पालिकेने सांगितले. तलावात कुठलेही निर्माल्य, तेलाचे दिवे सोडता येणार नाहीत या अटींवर भाविकांना फक्त अर्ध्य देणेसाठी नैसर्गिक तलावांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
छठ पूजेच्या ठिकाणी विशेष सुविधा
छठ पूजेच्या ठिकाणी नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात निर्माल्य कलश, निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छता गाड्या, सीसीटीव्ही कॅमेरे, दिवे सोडण्यासाठी ४० ठिकाणी कृत्रिम तलाव, सुरक्षारक्षक, शौचालय सुविधा विशेष बससुविधा या सुविधांचा समावेश आहे.
छठ पूजेसाठी महापालिकेकडून योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनीही न्यायालयाचे नियम पाळून छठ पूजा उत्सव साजरा करावा.मनोजकुमार सूर्यवंशी, वसई विरार महापालिका आयुक्त
