वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या आचोळे येथील रुग्णालयाच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुग्णालयाला महसूल विभागाकडून निशुल्क जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालिकेचे २२ कोटी रुपये वाचणार आहेत.

वसई विरार महापालिकेने प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ व सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेत २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता.

८ जुलै २०२४ रोजी नगरविकास विभागाने रुग्णालयासाठी २५० कोटी रुपये निधी मंजूर केला आणि पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयाचे काम मार्गी लागेल असे वाटले होते. मात्र विविध प्रकारच्या अडचणीमुळे रुग्णालयाचे काम पुढे सरकले नव्हते. रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या जागावेर सत्र न्यायालय व न्यायाधीश निवास स्थान प्रस्तावित असल्याने जागेची अडचण उभी राहिली होती. त्यामुळे मार्च महिन्यात जागा पुन्हा महसूल विभागाच्या नावावर करण्याची प्रक्रिया करण्यात आली

महसूल विभागाकडून जागा पालिकेला विकत घ्यावी लागणार होती. त्यासाठी २२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. परंतु महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे संबंधित जागा महसूल विभागाने रुग्णालयासाठी विनामूल्य द्यावी अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळ रुग्णालयाची जागा विनामूल्य हस्तांतरित करण्यात अडचणी येत होत्या. त्या दूर केल्यानंतर राज्य सरकारकडे रुग्णालयाला जागा देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत रुग्णालयासाठी जागा निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून रखडलेल्या रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

रुग्णालयाच्या कामाचे तीन वेळा भूमिपूजन

मागील पाच वर्षांपासून विविध राजकीय पक्ष यांच्या मार्फत केवळ रुग्णालयाच्या भूमीपूजन करण्याचा सपाटा सुरू आहे. १९ ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यानंतर १० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच दिवशी बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन आमदार क्षितीज ठाकूर यांनी सुध्दा रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते.