विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेकडून लवकरच विरारच्या नारींगी परिसरात पक्षी उद्यान (बर्ड पार्क) उभारले जाणार असून यानिमित्ताने शहरवासियांना विविध प्रजातीचे पक्षी पाहता येणार आहेत. या उद्यानात दुर्मिळ पक्षांसह विविध प्रजातीचे पक्षी ठेवण्यात येणार असून या कामासाठी ११६ कोटी इतका खर्च अंदाजित आहे. तसा प्रस्ताव तयार करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे.
विरार पश्चिमेच्या नारिंगी येथील परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे पक्षी उद्यान उभारले जाणार आहे. यासाठी पालिकेने आता हालचाली सुरु केल्या आहेत. हे उद्यान एकूण साडे सोळा हेक्टर जमिनीवर पक्षी उद्यान उभारले जाणार आहे अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यासाठी पालिकेच्या मालकीच्या नारिंगी येथील जागेचा वापर करण्यात येणार आहे. यात विविध प्रजातीचे तर काही दुर्मिळ पक्षांचा समावेश असणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना विविध पक्षांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे.
पक्षी उद्यानात पक्ष्यांसाठी नैसर्गिक निवाऱ्यांची सोय करणे तसेच पक्षांना मुक्तपणे विहार करता येईल अशी रचना करण्यावर पालिकेचा भर असणार आहे. यानिमित्ताने शहराला पहिलेच पक्षी उद्यान लाभणार आहे. याआधी तत्कालीन विरार नगरपरिषदेच्या काळात विरार पूर्वच्या तोटाळे तलाव परिसरात छोटेखानी पक्षी उद्यान उभारण्यात आले होते. यांनतर आता बऱ्याच वर्षानंतर शहरात भव्य पक्षी उद्यान उभारण्यात येणार आहे.
पर्यटनालाही चालना
शहरात उभारण्यात येणाऱ्या पक्षी उद्यानामुळे शहरातील नागरिकांना विविध पक्षांची ओळख होणार आहे. तसेच या निमित्ताने शहरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
शहराचा विकास करताना शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा तयार करणे तसेच पर्यावरणदृष्टीकोनातून पर्यटन कसे वाढेल याचा विचार ही पालिका करत आहे. पक्षी उद्याच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे. – मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई विरार महानगरपालिका