वसई : महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय वसई विरार महापालिकेने घेतला आहे. येत्या १ जून पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ७५ ते ८० हजार इतके प्रवासी प्रवास करतात
त्यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. यातील बहुतांश महिला या नोकरदार आणि सर्वसामान्य घरातील आहेत. त्यामुळे त्यांना बस प्रवासात सवलत देण्याची मागणी करण्यात येत होती. ज्याप्रमाणे एसटी महामंडळाने राज्यातील एसटी प्रवासात ५० टक्के दिली आहे. त्याच धर्तीवर पालिकेने आपल्या परिवहन सेवेच्या बस मध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत आयुक्त अनिलकुमार पवार यांनी १ जून २०२५ पासून महिला प्रवाशांना परिवहन सेेवेच्या बस मध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.महापालिकेच्या या निर्णयामुळे बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या रोजच्या प्रवासाचा आर्थिक बोजा हलका होणार आहे. तसेच कामगार महिला, विद्यार्थीनी आणि दररोज बसने प्रवास करणाऱ्या महिलांना या सवलतीचा थेट लाभ घेता येणार आहे.
परिवहन विभागाच्या सवलत योजना
परिवहन विभागाकडून विविध सवलतीच्या योजना राबवल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कर्करोग रुग्ण आणि डायलिसिस रूग्ण करोनामुळे पालक गमावलेली मुले, अनाथ, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना तसेच इंग्रजी वगळता अन्य माध्ममांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा दिली जात आहे असेही पालिकेने सांगितले आहे.