विरार : वसई विरार पालिकेच्या परीवहन सेवेतील नादुरुस्त असलेल्या बसेसचा वापर आता स्वच्छतागृहांसाठी केला जाणार आहे. यामुळे शहरात ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे तिथल्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. पालिकेच्या आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.

वसई विरार पालिकेच्या परिवहन विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना सेवा पुरवली जात आहे. सेवेतील अनेक बसेस बिघाड झाल्यामुळे बंद पडतात. अशा बसेस भंगारात जातात. अशाच बंद पडलेल्या बसेसचे रूपांतर आता स्वच्छतागृहांमध्ये होणार आहे असे पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा शहरातील काही भागांमध्ये जागेच्या अभावामुळे त्या परिसरात स्वच्छतागृह उभारणेही अवघड असते. अशा परिस्थितीत आता बसच्या माध्यमातून केलेली स्वच्छतागृहे उपयोगी येणार आहेत. यासाठी अशा बसेसमध्ये आवश्यक ते बदल पालिकेकडून केले जाणार असून लवकरच अशी स्वच्छतागृहे शहरात उपलब्ध होणार आहेत.

सध्या वसई विरार पालिकेच्या परिवहन विभागाकडे नादुरुस्त होऊन बंद पडलेल्या तीस ते चाळीस बसेस आहेत. या बस काही काळ अशाच पडून आहेत. या बसेसचा वापर स्वच्छतागृहे निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे शहरातही नागिरकांना विशेषतः महिलांना अशा स्वच्छतागृहांचा वापर करणे सुलभ होणार आहे.

पालिकेच्या ज्या बस पडून आहेत त्याचा पुन्हा कसा वापर होईल या दृष्टीने पालिका विचार करीत आहे. मुंबई मधील एका संस्थेच्या सोबत चर्चा ही सुरू आहे असेही पालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

ई शौचालयांची दुरवस्था

पाच वर्षापूर्वी वसई विरार शहरात महापालिकेने स्मार्ट ई शौचालय तयार करण्यात आले होते. मात्र या शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने त्या शौचालयांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लाखों रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागात ९ ई शौचालय तयार केले होते.यासाठी ९० लाख रुपये इतका निधी खर्च केला होता.

या ई शौचालय देखभाल दुरुस्तीचा ठेका ही दिला होता. मात्र संबंधित ठेकेदारांनी या ई शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या शौचालयांची अवस्था बिकट बनली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तर अन्य ठिकाणी स्वच्छता गृह नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.