वसई: वसई विरार शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, फिरते हौद, मूर्तींची वाहतूक करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, मंडप व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था अशा सर्व सुविधांच्या बाबतीत नियोजन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. मागील वर्षी महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अव्वल ठरला होता. एकूण विसर्जनाच्या ६५ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले होते. यंदा देखील पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी शहरात १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय प्रभाग निहाय प्रत्येकी दोन असे १८ फिरते हौद तयार केले जाणार आहेत. तर कृत्रिम तलावातील मूर्ती बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनासाठी नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दीड दिवसांसाठी ६३ वाहने, पाच दिवस ३६, सात दिवसांसाठी ५० आणि अकरा दिवसांसाठी २० अशा प्रकारे वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

शहरातील मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मारंबळपाडा, किल्ला बंदर, नायगाव अशा जेट्टीवर व मधूबन व वालईपाडा खदान अशा विविध ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय विसर्जनस्थळी मूर्ती संकलन केंद्रे, वैद्यकीय मदत कक्ष, आरती स्थळे, जीवरक्षकांची नियुक्ती, दिवाबत्ती, मंडप व्यवस्था, तसेच सुरक्षेच्या उपायोजनांचाही  समावेश असल्याचे पालिकेने सांगितले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही विसर्जनासाठी पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता आणि खड्डे दुरुस्तीवर भर दिला जाईल असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

खर्च नियंत्रण करण्याचा प्रयत्न

गणेशोत्सव काळात काही वेळा अनावश्यक सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. मागील वर्षी  गणेशोत्सवासाठी जवळपास साडे सात कोटी रुपये इतका खर्च झाला होता. यावर्षी ३० टक्के खर्च कपात करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

एक गाव एक गणपती उत्सव केल्यास गाव दत्तक

वसई विरार शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करीत असतानाच एक गाव एक गणपती अशी संकल्पना सुद्धा समोर आणली आहे.ज्या गावात एक गाव एक गणपती अशा पद्धतीने उत्सव साजरा करेल त्या गावाला पालिकेकडून दत्तक घेण्यात येईल असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पालिकेत बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सभागृहात सोमवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सुहास बावचे, प्रांताधिकारी शेखर घाडगे, महावितरण अधिकारी, गणेश मंडळे व नागरिक उपस्थित होते. या बैठकीत पालिकेने केलेले नियोजन व नागरिकांनी मांडलेल्या सूचना यांचा आढावा घेण्यात आला.

पोलीस प्रशासन सज्ज

गणेशोत्सवा दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे प्रशासनही सज्ज झाले आहे. यापूर्वीच बैठक घेऊन गणेश मंडळांना सूचना केल्या होत्या. प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी दररोज ५ ते ६ अधिकारी भेट देणार आहेत. आगमन व विसर्जन या दरम्यान कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे व पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितले आहे.

पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव  साजरा करण्यावर भर दिला असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय नियोजनाच्या दृष्टीने ज्या गोष्टी बाकी असतील त्या गोष्टी  पूर्ण करण्याचा पालिका प्रयत्न करीत आहे. :- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका