वसई: दिवाळीनिमित्त पालिकेच्या स्थायी आणि ठेका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. यात २२ हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आल्याने यंदा महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र खरेदीची लगबग सुरू आहे. खरेदीसाठी कर्मचारी हे वेतनावर अवलंबून असतात. त्यातच आता दिवाळीच्या निमित्ताने महापालिकेने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देत सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पालिकेत आस्थापना, वृक्ष प्राधिकरण, विधी विभाग, पाणीपुरवठा अतिक्रमण विभाग, क्रीडा विभाग, घनकचरा अशा विविध विभागात कंत्राटी, ठेक्याचे आणि कायम असे सुमारे ३ हजार ६४० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना २२ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली आहे.
सानुग्रह अनुदानात गतवर्षीपेक्षा दहा टक्के इतकी वाढ करण्यात आल्यामुळे यंदाच्या दिवाळीला अधिक गोडवा निर्माण होणार आहे. हे अनुदान दिवाळीच्या अगोदर दिले जाणार असल्याने कर्मचारीवर्गाला याचा फायदा होणार आहे. आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस विचारात घेऊन हे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. यासाठी सात ते आठ कोटी निधीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.