वसई: वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. या महिनाभरात पालिकेची केवळ २४ टक्के इतके नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. आता अवघा एक महिना हाती उरला असून पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेच्या समोर आहे.
वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले आहे. यातच उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे, माती भराव, विकासाच्या नावाखाली बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले यामुळे मागील काही वर्षांपासून वसई विरारकरांना पूरस्थितीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. तासभर जरी पाऊस झाला तरीही सखल भागात पाणी जमते. या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. शहरात १७१ किलोमीटर लांबीचे २०५ नाले आहेत. त्यांच्या सफाईचे काम ४ एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहे.
करण्यात येत असलेली नालेसफाई ही यांत्रिक पद्धतीने केली जात असून यासाठी २१ लॉंग बुम पोकलेन, ३१ शॉर्ट बुम पोकलेन, २० जेसीबी व गाळ वाहतुकीसाठी २५ डंपर कार्यरत करण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरातील २४ टक्के इतके नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. २०५ पैकी २८ नाले पूर्ण स्वच्छ केले असून उर्वरित नाल्यांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली आहे.
नाल्यातून गाळ काढल्यानंतर तो नाल्यापासून १५ मीटर दूर टाकला जातो आणि ज्या ठिकाणी रस्त्याची कडा किंवा जागा उपलब्ध नाही असा गाळ उचलला जात आहे. येत्या ३१ मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असेही पालिकेने सांगितले आहे.
काम धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप
वसई विरार महापालिकेचे नालेसफाई करण्याचे काम धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर दुसरीकडे नियमित पावसाळा सुरू होण्याची अवघा महिना उरला आहे यात ही नालेसफाई पूर्ण होईल की नाही अशी भीती ही व्यक्त केली जात आहे. योग्य ते नियोजन करून नालेसफाईचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अधिकाऱ्यांकडून आढावा
नालेसफाईचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात यावे यासाठी पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांच्या मार्फत दैनंदिन कामाचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत असे पालिकेने सांगितले आहे.
पावसाळ्यापूर्वीच सर्व नाले स्वच्छ कसे होतील या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. कामे सर्वच ठिकाणी सुरू आहेत.विहित वेळेत काम पूर्ण केले जाईल. याशिवाय नागरिकांच्या विशिष्ट स्वच्छतेबाबत काही तक्रारी असतील त्याचे निवारण केले जाईल. – नानासाहेब कामठे, उपायुक्त महापालिका (घनकचरा व्यवस्थापन)