वसई: वसई विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा जीर्ण झालेल्या इमारतींचा स्लॅब कोसळणे, इमारत कोसळणे अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात चार मजली इमारत भर पावसात कोसळली. या दुर्घटनेमुळे शहरात जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतींची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत. काही इमारतींचे बांधकाम हे फारच जीर्ण झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू होताच शहरात जीर्ण झालेल्या इमारतींचा स्लॅब, भिंत व इमारत कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
नुकताच नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी साई राज अपार्टमेंट पंधरा वर्षे जुनी असलेली इमारत भर पावसात कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या इमारतीचा धक्का बाजूला असलेल्या कुसूम अपार्टमेंट व नरेंद्र माऊली या इमारतींना ही बसला.त्या इमारती सुद्धा पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने वेळीच जर अशा जीर्ण झालेल्या इमारतींकडे लक्ष दिले असते तर अशा घटना टाळता आल्या असत्या असे माजी नगरसेवक चंद्रकांत गोरीवले यांनी सांगितले आहे. आता तरी महापालिकेने जागे होऊन शहरात असलेल्या जीर्ण इमारतींकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकले साहित्य
नालासोपाऱ्यात कोसळलेल्या व पालिकेने पाडण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुमारे ६५ सदनिका व १४ शॉप होते. या प्रकारामुळे मोठ्या संख्येने कुटुंब बेघर झाली आहेत. या इमारतीच्या ढिगार्याखाली बहुतांश कुटुंबाचे विविध प्रकारचे साहित्य, किंमती वस्तू, जीवनावश्यक वस्तू, महत्वाची कागदपत्रे अडकून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पालिकेकडून मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. ते साहित्य गोळा करण्यासाठी येथील रहिवाशांची धडपड सुरू आहे.
अतिधोकादायक जमीनदोस्त करण्यास सुरुवात
वसई विरार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात साठहून अधिक इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले होते. महापालिकेने त्यांना नोटिसा दिल्या होता. आता घडलेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने अतिधोकादायक इमारती खाली करून त्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
चालू वर्षातील दुर्घटना
५ जुलै २०२५ नालासोपारा अलकापुरी येथील साईराज अपार्टमेंट इमारत कोसळली. तातडीने इमारत खाली केल्याने दुर्घटना टळली.
१९ जून २०२५ नालासोपारा पूर्वेत मुसळधार पावसामुळे बावशेत पाडा येथील श्रीकृष्ण चाळीची भिंत कोसळली
३० मे २०२५ विरार- एमबी इस्टेट येथील मर्चेन इमारतीमधील ११ क्रमांकाच्या खोलीचा स्लॅब कोसळून अलफिया अब्बास मनासवाला या महिलेचा मृत्यू
२६ मे २०२५ विरार- गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेंट ३३५ क्रमांक सदनिकेचा स्लॅब कोसळला होता. यात लक्ष्मी सिंग (२७) महिलेचा मृत्यू.
२१ मे २०२५नालासोपारा- आचोळे येथील सिमरन साई या ४ मजली इमारतीच्या ४०४ क्रमांक खोलीचा स्लॅब कोसळळा. या खोलीत अडलेल्या एका महिलेसह १४ वर्षीय मुलाची अग्निशमन दलाने सुटका केली होती