वसई: वसई विरार शहरात रिसॉर्ट मधील तरण तलाव मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत. नुकताच विरारच्या अर्नाळ्यात ड्रिमलॅण्ड रिसॉर्टमध्ये एका आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा रिसॉर्ट मधील तरणतलावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील काही वर्षात वसई विरार शहराच्या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात बेसुमार रिसॉर्ट उभे राहिले आहेत. यास्त वसई गाव, भुईगाव, कळंब, राजोडी, अर्नाळा, वटार, वासलई, गिरिज, रानगाव, तसेच पूर्वेकडील भालीवली, तिल्हेर, वज्रेश्वरी, कौलार अशा भागात शेकडो रिसॉर्ट उभारण्यात आली आहेत. किनार पट्टीचा परिसर निसर्गरम्य असल्याने या भागात मुंबई, ठाणे, पालघर यासह अन्य भागातून पर्यटक येऊ लागले आहेत. मात्र काही रिसॉर्ट मध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत तर दुसरीकडे काही अतिहौशी पर्यटक आनंद लुटण्याच्या नादात सोबत आलेल्या लहान मुलांकडे ही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पर्यटक तरणतलावात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घटना घडत आहेत.
नुकताच विरार अर्नाळा येथील ड्रिमलॅण्ड रिसॉर्टमध्ये आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने एकप्रकारे हे तरणतलाव पर्यटकांसाठी मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत. काही तरण तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक नसणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे अशा कारणांमुळे या घटना अधिकच वाढत आहेत असे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.
काही ठिकाणी रिसॉर्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक घेतले जातात मग सुरक्षा रक्षक जरी असले तरी तेही सर्वच ठिकाणी लक्ष देण्यास कमी पडतात. त्यामुळे ही अशा घटना समोर येत असतात.रिसॉर्ट चालक व अन्य तरणतलावाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
बेकायदेशीर मद्य विक्री कारणीभूत
वसई तालुक्यातील अनेक रिसॉर्टला मद्यविक्रीचा परवाना नाही. असे असतानाही काही रिसॉर्ट मध्ये बेकायदेशीर पणे मद्याची विक्री होत असते. मात्र याकडे उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने रिसॉर्ट मध्ये बेकायदेशीर मार्गाने मद्य विक्री करण्याचे प्रकार सुरू असतात. अनेकदा मद्याच्या नशेत पर्यटक तरण तलावात उतरतात त्यामुळेही बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांकडून सतर्कतेच्या सूचना
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक रिसॉर्ट मध्ये पर्यटनासाठी येऊ लागले आहेत. या पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने रिसॉर्ट चालक यांची बैठक घेऊन तरणतलावाच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात असल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे. काही वेळा पर्यटक ही आनंद लुटत असताना काळजी घेत नाहीत त्यांनी सुद्धा स्वतःची व आपल्या सोबत आणलेल्या मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन ही पाटील यांनी केले आहे. जे रिसॉर्ट चालक दिलेल्या नियमांचे पालन करीत नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
तरण तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना
२९ मे २०२४रानगाव समुद्रकिनार्यावर एचडी नावाच्या रिसॉर्ट मध्ये समीक्षा जाधव (७) या चिमुकलीचा बुडून मृत्यू
९ मे २०२४ वसईच्या रानगाव येथील रॉयल रिसॉर्ट मध्ये असलेल्या तरणतलावात बुडून रिद्धी माने या १० वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये अर्नाळा येथील विसावा रिसॉर्ट मधील तरणतलावात बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
१४ जून २०२३ रोजी विरार पश्चिमेच्या नवापूर परिसरात असलेल्या सेव्हन सी रिसॉर्टमध्ये बांद्रा मुंबई येथील
मोहम्मद इमाद मुद्तसर या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.