वसई: वसई विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार, ग्राहकांना येणारी अवाजवी वीज देयके यामुळे बहुजन विकास आघाडीसह शेकडो नागरिकांनी रविवारी सकाळी विरार मध्ये मोर्चा काढला होता. यावेळी महावितरणच्या सुरू असलेल्या कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून विरार पूर्व परिसरात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. दैनंदिन कामाजात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, शहरातील व्यापाऱ्यांनाही यामुळे आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे, तासनतास वीज नसतानाही वीजदेयक वाढीव वीज देयके दिली जात आहे.
वीज समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वात रविवारी सकाळी विरार येथे मोर्चा काढला होता. यात माजी आमदार क्षितीज ठाकूर यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन विरार जी डी गार्डन येथील सभागृहात ही सभा झाली. यावेळी महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. याच दरम्यान एकापाठोपाठ एक अशा वीज समस्या मांडत वीज ग्राहकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली. सरकार अखंडित वीजपुरवठा देण्याचे आश्वासन देते आणि शहरात मात्र तासनतास वीज नसते.
वीज वापर नसतानाही सर्वसामान्य वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. ही समस्या सोडविण्याऐवजी महावितरणचे अधिकारी आधी देयके भरा,असे सांगून ग्राहकांना वेठीस धरत असल्याचा आरोप माजी आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला. वीज देयके भरली की परत त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होते. यात सुधारणा झाली पाहिजे असे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
शहरातील प्रस्तावित वीज उपकेंद्र,भूमिगत वीज वाहिनी,रोहित्र आणि अन्य विकासकामांसाठी सरकारने १७०० कोटींचा निधी मंजूर केलेला आहे.या कामांची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे.शिवाय; सर्वसामान्य वीज ग्राहकांनी उपस्थित केलेल्या त्यांच्या समस्यांचे निरसन महावितरणने कशापद्धतीने केलेले आहे? वीज अपघातांमुळे दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना महावितरणने आतापर्यंत किती मदत केली आहे?
अशा अनेक प्रश्नांची लेखी उत्तरे येत्या मंगळवारपर्यंत महावितरणने सादर करावीत अशी मागणी या दरम्यान करण्यात केली. वीज प्रश्न असाच राहिला तर यापुढे मोठे आंदोलन उभारू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून ज्या अडचणी येत आहेत त्या सोडवू असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिखलडोंगरी वीज उपकेंद्र निर्मितीत आडकाठी
शहरातील विरार-चिखलडोंगरी येथील वीज उपकेंद्राचे मागील वर्षी भूमिपूजन झालेले होते.या कामाला सुरुवात होणार होती; तोच सरकारला या जागेवरून आता सागरी महामार्ग न्यायचा आहे.त्यामुळे या वीज उपकेंद्राच्या कामात जाणीवपूर्वक आडकाठी घातली जात असल्याचा आरोप बविआ सचिव संघटक अजीव पाटील यांनी केला आहे.या संदर्भात महावितरण व संबंधित प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे.या वीज उपकेंद्रामुळे संपूर्ण शहराची वीज समस्या दूर होणार आहेत यासाठी तातडीने ती कामे पूर्ण करावीत अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.