वसई: वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे रस्तेही अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून सात ठिकाणचे मुख्य रस्त्यांचा विस्तार करून त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करून एमएमआरडीए कडे पाठविला आहे. मात्र त्या प्रस्तावाला अजूनही मंजुरी न मिळाल्याने रस्त्यांची कामे खोळंबली आहेत.

वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर एवढे आहे. वसई विरार शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. नवनवीन वसाहती विकसित होत आहेत. शहराची लोकसंख्या २५ ते ३० लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते.
 
याशिवाय दरवर्षी पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार होते.याच वाहनचालकांना मोठा फटका बसतो तर काही वेळा अपघातासारख्या घटना घडतात. मात्र रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने ही कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करवून घेतली जाणार आहेत.

त्याच अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी एमएमआरडीएकडे १ ऑगस्ट २०२४ मध्ये नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात प्रमुख सात रस्त्यांचा समावेश केला आहे. यात विरार फाटा ते अर्नाळा (१८ किलोमीटर), नालासोपारा फाटा ते नालासोपारा पश्चिम( ११ किमी), वसई फाटा ते वसई गाव (११ किमी), टिवरी फाटा ते भोयदापाडा (५ किमी), सातिवली फाटा ते रेंज ऑफिस (४ किमी) वर्धमान इंडस्ट्रियल,वालीव ते गावराईपाडा नाका (३ किमी), बापाणे फाटा, जूचंद्र ते उमेळा फाटा( १० किमी) या रस्त्यांचा समावेश केला आहे.

यात रस्त्यांचा विस्तार करून काँक्रिटीकरण गेले जाणार आहे. यासाठी सुमारे २८०० कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून मंजुरी साठी एमएमआरडीए कडे सादर केला असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावा मंजुरी मिळाल्या नंतरच ती कामे मार्गी लागतील असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील प्रमुख सात रस्त्यांचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी एमएमआरडीए कडे प्रस्ताव बनवून मंजुरी साठी पाठविला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या रस्त्यांची कामे मार्गी लागतील. सद्यस्थितीत पावसाळ्यात तयार झालेले खड्डे दुरुस्ती करण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे.- प्रदीप पाचंगे, प्रभारी शहरअभियंता महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खड्ड्यामुळे प्रवाशांचे हाल

वसई विरार शहरात महापालिकेकडून विविध ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेतली जातात. मात्र काही ठिकाणी रस्ते तयार करताना योग्य ते नियोजन नसल्याने रस्त्याची उंच सखल अशी स्थिती तयार झाली आहे. आता तर पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांची समस्या अधिकच वाढली आहे. जास्त काळ टिकतील असे रस्ते तयार करण्यावर भर द्यायला हवा तसे होत नसल्याने खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना हाल होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.