विरार : विरार सफाळे दरम्यान सुरु करण्यात आलेल्या रो रो फेरीबोटीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता अनेकदा या परिसरात वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. नुकताच बोटीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. यासाठी बोटींची संख्या व फेऱ्या वाढविण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे.

वसई विरार येथून सफाळे-पालघर आदी ठिकाणी जाण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी रो रो फेरोबोट सेवा सुरु करण्यात आली आहे. वैतरणा खाडीत विरार पश्चिमेच्या मारंबळ पाडा ते सफाळे येथील जलसारपर्यंत ही सेवा पुरविली जाते. दिवसाला यातून २१ फेऱ्या चालविल्या जातात.

विरार ते पालघर असा प्रवास करणारे वाहनचालक मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रो रो सेवेचा वापर करतात. सुट्टीच्या दिवशी रो रो सेवेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. यामुळे अनेकदा या परिसरात वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. तसेच अनेकदा फेरीबोटीतून अतिरिक्त क्षमेतेने वाहतूक करण्यात येते. 

रविवारी फेरीबोटीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने फेरीबोट वैतरणा खाडीत अडकून पडली होती. दोन तास फेरीबोटीतील प्रवासी अडकून पडले होते. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. याचा परिणाम काही काळ या मार्गावरील फेरीबोट सेवेवर झाला होता. या घडलेल्या घटनेनंतर फेरीबोटींची संख्या व त्यांच्या फेऱ्या ही वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

फेऱ्या वाढविण्यासाठी मंत्र्यांच्या सूचना 

रोरोच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे फेरोबोटीच्या वाढीव फेऱ्या सुरु करण्याची मागणी केली होती. याबाबत मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राणे यांनी सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच रो रो सेवेच्या वाढीव फेऱ्या सुरु  होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.