वसई:- विरार पश्चिमेच्या यशवंतनगर भागातील अमय क्लब येथील तरणतलावात (स्विमिंग पूल ) मध्ये साडेतीन वर्षीय ध्रुव बिष्ट या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता तरणतलावाच्या ठिकाणी असलेले दोन प्रशिक्षक व तेथील व्यवस्थापक अशा तिघांच्या विरुद्ध बोळींज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.विरार पश्चिम येथील यशवंत नगर साधे अमेय क्लासिक क्लब आहे. या क्लबमध्ये विरार मध्ये राहणारा ध्रुव चंदनसिंह बिष्ट (वय साडेतीन वर्षे) हा मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या आईसोबत अमेया क्लबच्या तरणतलावात गेला होता.याच दरम्यान त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
सुरवातीला बोळींज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. याबाबत ध्रुवची आई रेणू सिंह बिष्ट (३७) हिने बोळींज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यात त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षक यांनी लक्ष न दिल्याने माझ्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत सांगितले आहे. या मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आता त्प्रशिक्षणाकरीता असलेले प्रशिक्षक कौस्तुभ मेहेर, हर्ष शेट्टी तसेच व्यवस्थापक प्रविण झोरे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तरणतलावांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कायम
वसई विरार शहरात असलेले तरण तलाव दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागले आहेत. या तरण तलावात बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. तरण तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक नसणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन न होणे यामुळे तरण तलावात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.वसई विरार शहरातील रिसॉर्टसह अन्य ठिकाणी असणाऱ्या तरण तलावांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
