विरार : वसई विरार शहरातील वाढती वाहतूक कोंडीची समस्या तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात आता वाहतूक विभागाकडून सम- विषम पार्किंग सुरु करण्यात आले असून तसे फलकही शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता नियमांच्या अधीन राहून आपली वाहने पार्क करता येणार आहेत.

वसई विरार शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहारातील वाहनांची संख्याही वाढत आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून प्रशासनाकडून आणि वाहतूक विभागाकडून शहरात अनेक उपपयोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरात सम- विषम पार्किंग सुरु करण्यात आले आहे. सम आणि विषम पार्किंग दर्शविणारे फलकही शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत.

शहरात वाहनतळांची कमतरता असल्याने कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषकरून शहरातील रेल्वे स्थानक परिसर, मंडई आणि मुख्य रस्त्यांवर वाहनतळांची व्यवस्था नसल्याने नागरिक मिळेल त्या जागेत आपली वाहने उभी करून ठेवतात. सम- विषम पार्किंगमुळे नागरिकांना आपली वाहने योग्य ठिकाणी उभी करता येणार आहेत. मात्र अजूनही काही वाहन चालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काय आहे सम- विषम पार्किंग ?

सम- विषम पार्किंग हे वाहने अधिकृतरित्या उभी करण्यासाठी करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था आहे. रस्त्याच्या दुतर्फा अशी सुविधा असते. यात सम तारखेला म्हणजे २,४,६,८ अशा तारखांना वाहने सम बाजूला पार्क करता येतात. तर विषम तारखेला म्हणजे १,३,५,७ अशा विषम तारखांना वाहने विषम बाजूला पार्क करता येतात. तारखांनुसार वाहने पार्क न केल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

शहरात सम- विषम पार्किंग धोरण पहिल्यादांच अंमलात आणले जात आहे. यामुळे अनेक नागरिकांना याविषयी माहिती नाही. सम- विषम पार्किंगचे फलक लावल्यानंतरही वाहनचालकांकडून या धोरणाचे पालन केले जात नाही यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी दिली आहे.