वसई: वसई-विरार शहरात टँकर चालकांच्या बेदरकार आणि निष्काळजीपणामुळे गेल्या वर्षभरात अनेक लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तर, काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर परिवहन विभागाने कारवाईची मोहीम सुरु केली होती.सहा महिन्यात १३१ टँकरवर कारवाई करीत ७ लाख ८३ हजारांचा दंड वसूल केला आहे.

वसई-विरार शहरात अनेक टँकर चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत वाहने चालवतात. यामुळे सातत्याने टँकर अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चालक-मालकांच्या बैठका घेऊन सूचना दिल्या होत्या, पण काही दिवसांनंतर नियम पुन्हा पायदळी तुडवले जातात.

शहरातील वाढत्या लोकसंख्यामुळे दिवसेंदिवस मूलभूत सुविधांवरील ताण वाढत चालला आहे. अशातच काही भागात असणारी पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे. या मागणीचा गैरफायदा घेत अनेक नादुरुस्त, कालबाह्य आणि जुनाट टँकर देखील रस्त्यावरून धावत आहेत.

या बेदरकार टँकरमुळे २२ सप्टेंबर रोजी विरार टँकर अपघातात प्रताप नाईक (५५) यांचा मृत्यू झाला होता. तर ३१ जुलै रोजी नालासोपारा येथे राहणारे संदीप खांबे (४४) हे दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरची धडक लागून त्यांचा अपघात घडला होता यात संदीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. याशिवाय मनसेने ही मोर्चा काढत टँकरच्या बेदरकारपणाला आवर घालण्याची मागणी केली होती.

अखेर परिवहन विभागाने ही बेदरकार टँकरवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत सात महिन्यात १३१ टँकरवर कारवाई करण्यात आली आहे. तर टँकर चालकांकडून ७ लाख ८३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.अशी माहिती परिवहन विभागाचे सहायक परिवहन अधिकारी दीपक उगळे यांनी दिली आहे. ज्या भागातून पाण्याची वाहतूक अधिक होते, अशा ठिकाणी टँकर थांबवून त्यांची कसून तपासणी केली जात आहे. यात टँकरचे फिटनेस प्रमाणपत्र, परवानाधारक वाहनचालक आणि बॅच, टँकरसोबत क्लीनर आहे की नाही, पाणी गळती आणि रिफ्लेक्टर अशा विविध बाबींची तपासणी केली जाते.