वसई: मागील पाच दिवसांपासून पावसाचे पाणी अनेक ठिकाणच्या नागरी वस्तीत शिरून अक्षरशः घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे. या रोगराईला रोखण्याचे मोठे आव्हान आता पालिकेच्या समोर असणार आहे. मागील पाच दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहर जलमय झाले होते. अनेक ठिकाणच्या नागरी वस्तीत, गृहसंकुलात, चाळीत, पाण्याच्या टाकीत यासह विविध ठिकाणी पाणी शिरले होते. या पाण्यासोबत गटारातील घाण, प्लास्टिक, केरकचरा, गाळ, माती आदी सर्व वाहून आले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
ज्या ज्या भागात पाणी साचले आहे अशा ठिकाणांची पालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे. यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अतिशय दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाणी ओसरताच ज्या ज्या भागात पाणी साचून गाळ,कचरा वाहून आला आहे त्यांची स्वच्छता करवून घेतली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
तर दुसरीकडे डेंग्यू, हिवताप यासह इतर आजार निर्माण होऊ शकतात. यासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. तर नागरिकांना जिवाणू संसर्ग प्रतिबंध गोळ्या, ताप, सर्दी, खोकला अशा औषध गोळ्यांचा संच तयार करून ज्या भागात पाणी साचले होते अशा नागरिकांना दिले आहेत. यासाठी २१३ वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली असून ३६ हजार ५०६ नागरिकांना संचाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच डासांची पैदास होऊ नये यासाठी पाणी साचलेल्या ३९ हजार ६१६ कंटेनरची तपासणी करण्यात आली आहे.तसेच ज्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी गेले होते अशा टाक्या ही स्वच्छ करवून घेण्यास सांगण्यात येत आहे.
पाणी ओसरल्यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरातील स्वच्छतेला व आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. – दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका
आरोग्य तपासणी शिबिरे
वसई विरार शहरात ४४ ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. यात विशेषतः बैठ्या चाळी, गृहसंकुले, मिठागर वस्ती यांचा सामावेश आहे. अशा ठिकाणी आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे ही आयोजित केली जातील असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
दुर्गंधीने नागरिक हैराण
पावसाच्या साचलेल्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळले होते. तेच पाणी अनेक गृहसंकुलात शिरून बराच काळ त्याठिकाणी साचून होते. त्यामुळे घरातही या गटाराची दुर्गंधी येत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. यासाठी पालिकेनेही यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.