विरार : वसई-विरार पालिकेची स्थापना होऊन सोळा वर्षे उलटली तरीही पालिकेला स्वतःच्या मालिकीचे नाट्यगृह उभारता आलेले नाही. नालासोपारा येथील मजेठिया नाट्यगृहाचे काम मुदत संपली असली तरीही मागील सहा वर्षपासून रखडलेले आहे. त्यामुळे वसईकरांना सुसज्ज नाट्यगृहासाठी वाट पाहावी लागणार आहे. नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी आता नागरिक करत आहे.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या वसईत वर्षभर अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. नाट्यक्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार ही या शहरात वास्तव्याला आहेत. मात्र, असे असले तरीही कार्यक्रमांच्या आयोजकांना खाजगी सभागृहांवर किंवा खाजगी महाविद्यालयांच्या सभागृहांवर अवलंबून राहावे लागते. तिथले भाड्याचे दर हे जास्त असल्याने अनेकदा आयोजकांना कार्यक्रम रद्द करावे लागतात. तसेच सुज्ज नाट्यगृह नसल्याने मुबंई-पुण्यातील अनेक नाट्य संयोजक वसईत नाटकाचे प्रयोग करत नाही. त्यामुळे वसईकरांना नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी मुंबईला जावे लागते.
मजेठिया नाट्यगृहाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल आणि १ मे रोजी या नाट्यगृहाचे लोकार्पण केले जाईल असे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले होते. मात्र दोन -अडीच महिने उलटून गेल्यानंतर नाट्यगृहाचे काम अपूर्णच असल्याने नाट्यगृहासाठी अजून किती काळ वाट पाहायची असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
मजेठिया नाट्यगृहाचे काम का रखडले ?
२०२१ साली मजेठिया नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. काम वेळेत न झाल्याने २०२३ मध्ये पालिकेच्या विरोधात मानव अधिकार न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला होता. त्यांनतर बांधकाम करण्यात आले मात्र नाट्यगृहाच्या आतील ध्वनिक्षेपण, वातानुकूलित आणि अग्निशमन अशा मुख्य यंत्रणांचा समावेश मंजूर अंदाजपत्रकात नसल्याने काम अजूनही रखडलेलेच आहे.
कामाला गती देण्याच्या सूचना
नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी वसईच्या विकास कामात नाट्यगृहाचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता. यावेळी सदरनाट्य गृहाचे काम ही तातडीने पूर्ण करावे अशा सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.