भाईंदर :- सहा फुटाखालील मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या सूचना मिरा-भाईंदर महापालिकेने दिल्या आहेत. मात्र या निर्णयाला भाईंदरमधील मूळ गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेत प्रशासन अडथळा आणत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

यंदा राज्य शासनाने २१ जुलै २०२५ रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार सहा फुटाखालील मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात शाडू तसेच पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे. त्यानुसार मिरा-भाईंदर महापालिकेने सहा फुटाखालील मूर्ती विसर्जनासाठी शहरात ३३ कृत्रिम तलाव उभारले आहेत. मात्र या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाईंदरमधील राई, मोर्वा आणि मुर्धा गावातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भातील भूमिका गावकऱ्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केली आहे. त्यात सामूहिक आरतीनंतर मूर्ती तशाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. काहीजण या भूमिकेशी सहमत नसले तरी बहुतांश गावकरी कृत्रिम तलावातील विसर्जनाला विरोध करीत आहेत.

या गावांत प्रामुख्याने पाच दिवस गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. तर फारच कमी ठिकाणी दीड दिवसाचे गणपती असतात. यापूर्वी या गणेश मूर्तींचे विसर्जन गावातील नैसर्गिक तलावात केले जात होते. मात्र आता प्रशासनाने तलावा शेजारी कृत्रिम तलाव उभारल्यामुळे हा विरोध सुरु झाला आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे काय?

मिरा-भाईंदर शहरात सुमारे १९ जुनी गावे आहेत. या गावांचा दोनशे वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. येथे प्रामुख्याने आगरी समाजाचे वास्तव्य आहे. हा समाज पारंपरिक पद्धतीने सण साजरे करत आला आहे. मात्र आता पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली गावांची संस्कृती आणि प्रथा मोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आज तलावात मूर्ती विसर्जनास नकार देणाऱ्या महापालिकेचे सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाते, अपुऱ्या नाल्यांच्या कामामुळे आगरी नागरिकांची मिठागर उद्ध्वस्त झाली आहेत, तसेच अनेक विकासकामांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा दिखावा महापालिका अधिकारी करीत असल्याचा आरोप राई गावचे रहिवासी प्रशांत म्हात्रे यांनी केला.

अधिकाऱ्यांचा प्रयत्न

राज्य शासनाच्या सूचनांनुसारच महापालिकेने कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक विसर्जनाची शंभर टक्के अंमलबजावणी करणे, ही महापालिकेची भूमिका आहे. मात्र हा प्रश्न केवळ विसर्जनापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या श्रद्धा व भावनांशी निगडित आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती केली जात असून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पर्यावरण अधिकारी योगेश गुणीजन यांनी लोकसत्ताला दिली.