विरार : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून देवीचा जागर केला जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात भाविकांकडून विविध पद्धतीने आदिशक्तीचा जागर केला जातो. विरार पूर्वेच्या भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी अनोख्या पद्धतीने सुपारीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या देवी साकारल्या आहेत. या कलेतून देवींची रूपे पाहायला मिळत आहेत.

कौशिक यांनी जलरंग वापरून देवीच्या मूर्ती सुबकपणे सुपारीवर साकारल्या आहेत. महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. नवरात्रकाळात या साडेतीन शक्तीपिठांची भाविकांकडून विशेष पूजा केली जाते.

सुपारीवर अतिशय बारकाईने कौशिक यांनी या मुर्ती रेखाटल्या असून त्यांची ही कला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यात कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि नाशिकमधील वणीची सप्तशृंगी देवी आदी साडेतीन शक्तीपीठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवींचा समावेश आहे.

कौशिक हे विरार पूर्व येथील निसर्गरम्य भाताणे गावाचे रहिवासी आहेत. ते चित्रकार असून विविध माध्यमातून आपली कला सादर करत असतात. यापूर्वी त्यांनी गणेशोत्सवात सुपारीवर अष्टविनायक साकारले होते. सुपारीवर चित्रकारी करणे हा माझा छंदच झाला आहे. अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे अतिशय बारकाईने सुपारीवर साकारता आनंद होतो असे कौशिक जाधव यांनी सांगितले.