विरार : शहरातील चौकात उभारण्यात आलेल्या कारंज्यातील पाण्याचा वापर आता खाजगी वाहने धुण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या सुशोभीकरणा दुरुपयोग होत असून याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी पालिकेकडून कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र दुरुस्ती आणि देखभाल अभावी अनेक ठिकाणी या चौकांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकणी उभारण्यात आलेल्या शिल्पांची मोडतोड झाली आहे तर काही ठिकाणी थेट चोरटयांनी सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या वस्तूंची चोरी केली आहे. याबाबत आता नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कारंज्यात असलेल्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले आहे.

माजी स्थायी समिती सदस्य किशोर पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या वस्तूंच्या देखभाल-दुरुस्तीवर लक्ष दिले जात नाही यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या कामांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाच्या चौकशीची मागणी केली आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल तसेच कारंज्यातील पाण्याचा वाहने धुण्यासाठी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाईल असे पालिकेडून सांगण्यात आले आहे.

‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२` अंतर्गत वसई-विरार शहरातील १४ चौक सुशोभित केले होते तर १७ ठिकाणी कारंजी बसविली होती. तीन ठिकाणी शिल्पं उभारलेली होती. तर तब्बल २८ ठिकाणी जीव्हीपी पद्धतीचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे. यातील अनेक चौकांची दुरवस्था झाली आहे तर काही ठिकणी कारंजी नादुरुस्त झाली आहेत. यामुळे साचलेल्या पाण्याचा वापर नागरिकांकडून वाहने धुण्यासाठी होत आहे. तर साचलेल्या पाण्यामुळे डास आणि दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कारंज्यातील पाण्याचा वापर लहान मुले आणि नागरिकांकडून आंघोळीसाठी केला जात असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे चौकातील कारंज्याचे विद्रुपीकरण थांबवून त्यांचे संरक्षण करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.