विरार :- विरारमध्ये अनधिकृत इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता.या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रभागनिहाय पथके नियुक्त केली आहेत. एकूण १० पथके असून त्यात ५० जणांचा समावेश आहे.
नुकताच विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरात रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली अनधिकृत इमारत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून १७ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले. याशिवाय घटनेनंतर अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात असून हीच बांधकामे आता नागरिकांच्या जीवावर उठली आहेत.
आता गणेशोत्सव सरल्यानंतर तातडीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नुकताच महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत विशेष पथके तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने प्रभागनिहाय पथके नियुक्त केली आहेत. अशी एकूण १० पथके तयार केली आहेत. एका पथकात ५ कर्मचारी यांचा समावेश ठेवण्यात आला आहे. येत्या ८ सप्टेंबर पासून अनधिकृत बांधकाम कारवाईसाठी ही पथके सज्ज ठेवली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे