विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरामध्ये दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेची घनकचरा गाडी खड्ड्यात अडकून मुख्य रस्त्यावरच आडवी झाली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. जवळपास दोन ते तीन तास कोंडी कायम राहिल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले आहेत.

विरार पूर्वेच्या भागातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे. शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर पडण्याचा हा प्रमुख मार्ग असल्याने दररोज या भागातून मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र शुक्रवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास चंदनसार येथे गुजरात गॅस वाहिनीसाठी रस्त्याच्या मध्येच खणलेल्या खड्ड्यात महापालिकेची कचरा वाहतूक करणारी गाडी त्यात अडकून पडली होती.

विशेषतः विरार वरून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरच ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णतः ठप्प झाले होती. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहन चालकांनी शहरात जाणाऱ्या वाहिनीवरून वाहने चालविण्यास सुरवात केली त्यामुळे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने आल्याने वाहनांच्या लांबच लांबच रांगा लागल्या होत्या. जवळपास आठ ते दहा किलोमीटर इतक्या रांगा लागल्याने कामानिमित्त घराच्या बाहेर पडलेल्या नागरिकांना या कोंडीत अडकून राहावे लागले. सुरवातीला वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस जागेवर नसल्याने ही समस्या अधिक जटिल झाली असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

क्रेनच्या मदतीने अडकलेले वाहन बाजूला केल्यानंतर येथील वाहतूक सेवा सुरळीत झाली. कचरा गाडी अडकून पडल्याने कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक नियंत्रण करून वाहतूक सेवा सुरळीत केली.- महेश शेट्ये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग विरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासकामे अर्धवट असल्याचा फटका

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर पालिकेची जलवाहिन्या टाकणे, गटार व्यवस्था, गॅस वाहिन्यांच्या काम यासह अन्य कामाचे विकास कामे सुरू आहेत. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर अजूनही कामे पूर्ण झाली नाहीत तर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे वाहतुकीला आणखीनच अडथळे निर्माण होऊन कोंडीत भर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.