वसई: वसई विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी पालिकेने शहरात नऊ प्रभागात ६०  क्लीन अप मार्शल नियुक्ती केली आहे. मागील तीन महिन्यात शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांकडून २५ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

वसई विरार महापालिकेकडून स्वच्छतेविषयी जनजागृती करून ही शहरात अस्वच्छता पसरविण्याचे काम काही जण करीत आहे. शहरात तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करून थेट रस्त्यावर व सार्वजनिक थुंकणे, कचरा फेकणे, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर टाकणे अशा प्रकारे अस्वच्छता पसरविली जाते. 

शहरात निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो याशिवाय नागरी आरोग्यावर ही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शहर ही बकाल होते.

अशा प्रकाराला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अस्वच्छता पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची योजना आखली आहे. यासाठी नऊ प्रभागात ६० क्लीन अप मार्शल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त केलेल्या क्लीन अप मार्शल मार्फत सार्वजनिक परिसर, रस्ते, रेल्वे स्थानकालगतचा परिसर, आरोग्य केंद्र, बस स्थानके, शाळा महाविद्यालये, उपहारगृहे ,महामार्ग यासह विविध भागात  दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

मागील तीन महिन्यात शहरातील विविध ठिकाणच्या भागात कारवाई करीत सुमारे २५ लाखांचा दंड वसूल केला आहे. नागरिकांनी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

शहर स्वच्छ राहावे यासाठी पालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. शहरात अस्वच्छता पसरवतात त्यांच्यावर क्लीन अप मार्शल कडून कारवाई केली जात आहे.:- अर्चना दिवे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग महापालिका