वसई: करोना धोका लक्षात घेता शहरात असलेले प्राणवायू (ऑक्सिजन) प्रकल्प पुन्हा एकदा पालिकेने कार्यान्वित केले आहेत. यात सुमारे ७८.२१ इतक्या मॅट्रिक टन प्राणवायूचे नियोजन करून ठेवण्यात आले आहे.

सुरवातीला करोनाचे  संकट उभे राहिले त्या काळात वसई विरार शहरात करोनाबाधित रुग्णांना प्राणवायूची अधिक गरज भासली होती.परंतु सुरवातीला पालिकेचे प्रकल्प नसल्याने प्राणवायूची टंचाई निर्माण झाली होती. 

करोनाचे संकट व भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याच दृष्टीने  शासनाकडून जिल्हास्तरावर प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. याच अनुषंगाने महापालिकेने  प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून चार ठिकाणी पालिकेने  प्राणवायू प्रकल्प उभारले होते.यामध्ये  चंदनसार, बोळींज, सोपारा, वसई वरूण इंडस्ट्री यांचा समावेश होता.

मात्र त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे  प्राणवायू प्रकल्प हे बंद अवस्थेत पडून होते. याशिवाय जास्त काळ जर हे प्रकल्प पडून राहिले तर त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासूनराज्याच्या विविध ठिकाणच्या भागात करोना रुग्ण आढळून येत असतानाच आता वसई विरार मध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत शहरात एकूण १० करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भूमीवर वसई विरार महापालिका सज्ज झाली आहे.

यापूर्वी प्राणवायूची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता आता पालिकेने पूर्व तयारी करून ठेवली आहे. जे बंद असलेले प्राणवायू प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे. सद्यस्थितीत वसई विरार महापालिकेने ७८.२१ मॅट्रिक टन इतक्या प्राणवायूचे नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.

अशी आहे प्राणवायूची स्थिती

पालिकेने ७८  मॅट्रिक टनाहून अधिक  प्राणवायूची व्यवस्था झाली असून यात एल एम ओ ५ – ५३ मॅट्रिक टन, पी एस ए ३- ३.७५ मॅट्रिक टन, जम्बो सिलेंडर ९२५ – ८.४० मॅट्रिक टन, ड्युरा सिलेंडर २१ – ५.४ मॅट्रिक टन, छोटे सिलेंडर ३२०- ०.६२ मॅट्रिक टन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ३१७ – ७.४ मॅट्रिक टन अशी एकूण ७८.२१ मॅट्रिक टन प्राणवायू उपलब्ध आहे.

आतापर्यंत शहरात १० करोनाबाधित

वसई विरार शहरातही करोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे.आतापर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाने ४२ हजार ६३६ इतक्या जणांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यातून ३६६ जणांच्या करोना चाचण्या केल्या होत्या. त्यामध्ये १० रुग्णांना करोनाची लागण झाली असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यावर उपचार प्रक्रिया सुरू असून बहुतांश रुग्ण बरे झाले आहेत असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

यापूर्वी प्रकल्प स्वारस्य अभिरुचिवर देण्याचा प्रयत्न

मध्यंतरी चारही प्राणवायू प्रकल्प हे बंद अवस्थेत पडून होते. जास्त काळ जर हे प्रकल्प पडून राहिले तर त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता होती. म्हणून पालिकेने या प्राणवायू प्रकल्प स्वारस्य अभिरुची या तत्वावर चालविण्यास देण्याचा विचार सुरू करण्यात आला होता.