वसई: वसईतील एका निवासी संकुलात भर दुपारी  दरोडा पडला. सोमवारी दुपारी तीन जणांनी घरात शिरून महिला आणि तिच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले आणि घरातील १० लाखांचा ऐवज लुटून नेला. यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे.

वसई पूर्वेच्या वालीव सातिवली परिसरात रिलायबल ग्लोरी नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत राऊत कुटुंबिय राहतात. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास तीन अनोळखी इसमांना दाराची बेल मारली. यावेळी राऊत यांच्या १५ वर्षांच्या मुलाने दार उघडले. तेव्हा चेहर्‍यावर मास्क लावलेल्या तिघा जणांनी त्या मुलाला धक्का देत घरात प्रवेश केला. त्यांनी मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. ही घटना घडत असताना त्याची आई संगिता राऊत स्वंयपाकघरात होती. तिच्यावरही चोरांनी चाकूने हल्ला केला व तिला बांधून ठेवले. तसेच चाकूचा धाक दाखवत तिच्याकडून कपाटातील चावी घेऊन कपाटात असलेले १० लाखांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. या झटापटीत संगिता राऊत या जखमी झाल्या आहेत. तर भरदिवसा वसईत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेत एकूण तीन आरोपी सामील असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांची ४ पथके तयार करण्यात आली असून गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करत आहे. चोरीच्या घटनेची संबंधित लोकांची चौकशी करून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा आम्ही लवकरच उघडकीस आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

वसईत दरोड्याच्या वाढत्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

वसई-विरार शहर परिसरात गेल्या काही दिवसांत दरोडा आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांचे वाढते धाडस आणि चोरीच्या सततच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी नायगाव पूर्वेतील सनटेक वर्ल्ड इमारतीतील सदनिकेतून सहा लाख किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली असताना. नायगाव येथील सराफा दुकानातून भिंतीला कटर मशीनने भगदाड पाडून तीन आरोपींनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.